आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ संयुक्त अरब अमिरातीमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. यात सुपर १२ ची फेरी म्हणजेच मुख्य स्पर्धा २३ ऑक्टोबर पासून सुरू होतील. या फेरीत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अबुधाबीच्या मैदानात आपने-सामने येतील. टी-२० क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत अनेक विक्रमही झाले आहेत.
वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर टी-२० विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आहे. १६ मार्च २०१६ रोजी मुंबईत झालेल्या सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ४८ चेंडूत शतक ठोकले होते. एवढेच नाही तर टी-२० विश्वचषकातील दुसरे सर्वात जलद शतकही गेलच्याच नावावर आहे. ११सप्टेंबर २००७ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्यात या डावखुऱ्या सलामीवीराने ५७ चेंडूत शतक झळकावले होते.
त्याचा हा विक्रम अगामी टी२० विश्वचषकात मोडला जाऊ शकतो. या लेखातून आपण अशा तीन फलंदाजांचा आढावा घेऊ जे गेलचा हा विक्रम मोडू शकतात.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा आगामी टी -२० विश्वचषकात सर्वात जलद शतकासाठी आपले नाव नोंदवू शकतो. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने आतापर्यंत १११ टी-२० सामन्यांमध्ये ३२.१८ च्या सरासरीने आणि १३८.९६ च्या स्ट्राईक रेटने २८६४ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितने ४ शतके आणि २२ अर्धशतके केली आहेत.
टी२० विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाचा गेलचा विक्रम मोडण्याची क्षमता रोहितमध्ये आहे. कारण यापूर्वी रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम केला आहे. २०१७ मध्ये इंदूर येथे झालेल्या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते.
ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ७२ टी-२० सामन्यांमध्ये ३१.७९ च्या सरासरीने आणि १५८.५३ च्या स्ट्राईक रेटने १७८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. त्याच्याकडे सर्वात वेगवान शतक ठोकण्याचीही क्षमता आहे. हा उजव्या हाताचा फलंदाज गेलचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडू शकतो.
डेव्हिड मिलर
सध्याच्या काळातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड मिलर. आगामी टी-२० विश्वचषकात सर्वात जलद शतकाच्या यादीत आपले नाव नोंदवू शकतो. त्याने आतापर्यंत ८९ आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यांमध्ये ३१.७८ च्या सरासरीने आणि १४०.४३ च्या स्ट्राईक रेटने १७१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके आणि १ शतकही केले आहे.
आंतरराष्ट्रीय टी -२० मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम संयुक्तरित्या मिलरच्याही नावावर आहे. त्याने २०१७ मध्ये पोचेस्टरूममध्ये बांगलादेशविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते.
जॉस बटलर
या यादीतील चौथे नाव इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरचे आहे. त्याची गणना जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत ८२ आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यांमध्ये ३१.७१ च्या सरासरीने आणि १३९.४० च्या स्ट्राइक रेटसह १८७१ धावा केल्या आहेत. यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
आगामी टी-२० विश्वचषकात बटलर वेगवान शतकाचा गेलचा विक्रम मोडू शकतो. बटलरने अद्याप टी-२० मध्ये शतक झळकावले नाही, परंतु त्याच्याकडे कोणत्याही संघाची गोलंदाजी फोडून काढण्याची क्षमता आहे.
मोहम्मद रिझवान
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी टी -२० मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम तो करू शकतो. रिझवानने ४३ आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यांमध्ये ४८.४१ च्या सरासरीने आणि १२९.०९ च्या स्ट्राईक रेटने १०६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ८ अर्धशतके केली आहेत. त्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजाला सहज खेळण्याची क्षमता आहे.
निकोलस पूरन
वेस्ट इंडिजचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनची गणना सर्वात प्रतिभावान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्याकडे कोणतीही धारदार गोलंदाजी नष्ट करण्याची क्षमता आहे. पूरनने आतापर्यंत ४१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये २२.६८ च्या सरासरीने आणि १२४.२७ च्या स्ट्राईक रेटने ६३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतके केली आहेत. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात पुरन सर्वात जलद शतक झळकावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आकरा खेळाडू मिळूनही करु शकले शेवटच्या फलंदाजाला बाद, सामना राहिला अनिर्णीत; पाहा व्हिडिओ
ओमानने मुंबईविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत सामना जिंकला, अशी आहे मालिकेतील स्थिती
आयर्लंडची ऐतिहासिक कामगिरी, झिम्बाब्वे संघाला पराभूत करत टी२० मालिका घातली खिशात