वनडे क्रिकेटच्या प्रकारात हल्ली अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, अष्टपैलू क्रिकेटपटू वेळेनुसार फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या तिन्ही विभागात उत्तम प्रदर्शन करु शकतात. सध्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सपासून ते भारतातील हार्दिक पंड्यापर्यंत अशा उभरत्या खेळाडूंना वनडेतील अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या श्रेणीमध्ये सामाविष्ट केले जाऊ शकते.
यापुर्वी भारतातील कपिल देवपासून ते दक्षिण आफ्रिकाच्या शॉन पोलॉकपर्यंत अष्टपैलू क्रिकेटपटूंनी आपला जलवा दाखवला आहे. पण क्रिकेटविश्वात असेही काही निवडक क्रिकेटर्स होऊन गेले, ज्यांनी वनडेत केवळ १० हजारांपेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा केलेला नाही तसेच त्यांनी गोलंदाजी करत १००पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत आणि क्षेत्ररक्षणादरम्यान १०० पेक्षा जास्त झेलही पकडले आहेत. यावरुन त्यांनी स्वत:ला संघातील एक परिपूर्ण खेळाडू असल्याचे सिद्ध करुन दाखवले.
तर बघूयात कोण आहेत ते ६ खेळाडू ज्यांनी वनडेत असे दुर्मिळ यश साध्य केले आहे- 6 Players With More Than 10000 Runs, 100 Wickets & 100 Catches In ODI
सचिन तेंडुलकर – (धावा- १८४२६, विकेट्स- १५४, झेल- १४०)
क्रिकेटजगतात विक्रमांचे विक्रम म्हटले की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे नाव पहिले येते. आपल्या चमकदार २३ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत सचिनने ४६३ सामने खेळत १८४२६ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर, त्याने लेग ब्रेक, ऑफ ब्रेक यांच्या मिश्रणाने गोलंदाजी करत १५४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. तर, आपल्या दमदार क्षेत्ररक्षणाने सचिनने तब्बल १४० झेल पकडले आहेत.
सनथ जयसूर्या – (धावा- १३४३०, विकेट्स- ३२३, झेल- १२३)
श्रीलंकाचा सर्वकालिन महान खेळाडू सनथ जयसूर्या हा खरा तर फलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटू होता. पण त्याची गोलंदाजीतील कामगिरीही तितकीच उल्लेखनीय आहे. आपल्या २२ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ४४५ सामने खेळत जयसूर्याने ३२३ विकेट्स घेतल्या आहेत. तर, १२३ झेलही झेलले आहेत. विशेष म्हणजे, आठव्या क्रमांकावरुन आपल्या फलंदाजीची सुरुवात करणाऱ्या जयसूर्याने वनडेत १३४३० धावांचा टप्पा गाठला आहे.
जॅक्स कॅलिस – (धावा- ११५७९, विकेट्स- २७३, झेल- १३१)
दक्षिण आफ्रिकाचा खेळाडू जॅक्स कॅलिस या निसंदेह आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर १८ वर्षांत ३२८ वनडे सामने खेळत कॅलिसने ११५७९ धावा केल्या आहेत. तर, वेगवान गोलंदाजी करत २७३ विकेट्स घेतल्या आहेत आणि १३१ झेल झेलण्याचा पराक्रम केला आहे.
सौरव गांगुली – (धावा- ११३६३, विकेट्स- १००, झेल- १००)
भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी सौरव गांगुलीने भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. गांगुलीने आपल्या १५ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत हे दुर्मिळ यश संपादन केले आहे. त्याने ३११ वनडे सामन्यात ११३६३ धावा केल्या आहेत. तर, गोलंदाजी करताना १०० विकेट्स आणि क्षेत्ररक्षणादरम्यान १०० झेल झेलले आहेत.
ख्रिस गेल – (धावा- १०४८०, विकेट्स- १६७, झेल- १२४)
युनिव्हर्सल बॉस या नावाने ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेलने त्याच्या २० वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ३०० सामने खेळले आहेत. त्याने आक्रमक फलंदाजी करत वनडेत एकूण १०४८० धावा केल्या आहेत. तर, आपल्या फिरकी गोलंदाजीने १६७ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. शिवाय क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने पकडलेल्या १२४ झेलसह तो एक गुणवंत खेळाडू बनला.
तिलकरत्ने दिलशान – (धावा- १०२९०, विकेट्स- १०६, झेल- ११८)
श्रीलंकाचा सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशानने आपल्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही नावलौकिक मिळवला आहे. तो गरज पडल्यास यष्टीरक्षणदेखील करत होता. दिलशानने १७ वर्षे वनडे क्रिकेट खेळत ३३० सामन्यात १०२९० धावा केल्या आहेत. तर, आपल्या फिरकी गोलंदाजीने १०६ फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या आहेत. तर क्षेत्ररक्षण करताना ११८ झेल झेलले आहेत.
एवढेच नाही तर, या यादीत दिलशान हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने यष्टीरक्षण करताना एका फलंदाजाला यष्टीचीत केले आहे.
या भारतीय खेळाडूंची नावे होऊ शकली असती या यादीत सामाविष्ट
जर, राहुल द्रविड आणि विराट कोहलीची गोलंदाजी मजबूत असली असती, तर या २ खेळाडूंची नावेही या यादीत सामाविष्ट झाली असती. कारण, द्रविडने वनडेत १०८८९ धावा केल्या आहेत आणि १२४ झेल झेलले आहेत. तर, विराटने वनडेत ११८६७ धावा केल्या आहेत आणि १२८ झेलही झेलले आहेत. परंतु त्यांनी खूपच कमी वेळा गोलंदाजी केली आहे.
ट्रेंडिंग लेख-
३ मोठी कारणं, ज्यामुळे आयपीएल २०२०चे आयोजन करणे ठरेल चुकीचे
कसोटी, वनडे आणि टी२०त सर्वाधिक महागडे षटक टाकणारे ३ भारतीय गोलंदाज
३ असे ‘क्रीडापटू’, जे पुढे जाऊन झाले आपल्याच राज्याचे ‘मुख्यमंत्री’