---Advertisement---

विश्वचषकात पाकिस्तान महिला संघाकडून मोठी चूक; एकाच षटकात टाकले ‘इतके’ चेंडू

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 2:13 PM
---Advertisement---

क्रिकेटमधील एक षटक हे ६ चेंडूंचे असते. परंतु आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाली. पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात शुक्रवारी (११ मार्च) विश्वचषकातील ९ वा सामना खेळला गेला. या सामन्यातदरम्यान एक षटक ६ ऐवजी ७ चेंडूंचे टाकले गेले. षटकात चेंडू वाइड किंवा नो चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाला अधिकचे चेंडू टाकावे लागतात, पण या षटकात एकही वाईड किंवा नो चेंडू पडला नव्हता. तरीही पाकिस्तान संघातील गोलंदाजाने ७ चेंडू टाकले. आयसीसी स्पर्धेसारख्या मोठ्या मंचावर अशी चूक झाल्यामुळे याची चर्चा होत आहे.

शुक्रवारी पाकिस्तान महिला संघ आणि दक्षिण अफ्रिकेचा महिला संघ (Pakistan W vs South Africa W) आमने-सामने आला होता.  दक्षिण अफ्रिका संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी केली. अफ्रिकेच्या फलंदाजीवेळी २७ व्या षटकात ही घटना घडली. या षटकात पाकिस्तानची ओमाइमा सोहेल गोलंदाजी करत होती. या षटकात तिने ७ धावा दिल्या होत्या. परंतु अधिकच्या एका चेंडूवर दक्षिण अफ्रिका संघाने ८ वी धावही घेतली.

क्रिकेटच्या मैदानात एक-एक धाव आणि चेंडू खूप महत्वाचा असतो. एका धाव किंवा एका चेंडूमळे संघाच्या हातातोंडाला आलेला घास खाली पडू शकतो. एक धाव कमी पडल्यामुळे संघाच्या हातातून विश्वचषकासारखी मोठी ट्रॉफीही निसटू शकते. आयसीसी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये या अशा लहान चुका संघांना महागात पडू शकतात.

पाकिस्तान महिला संघालाही ही चूक महागात पडण्याची शक्यता आहे. महिला विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तान संघाला त्यांच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्ताला भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाला आहे आणि तिसऱ्या सामन्यात संघाकडून अशी चूक घडली आहे. जर या एका चेंडूमुळे सामन्याच्या निकालावर परिणाम पडला, तर याला जबाबदार कोण असेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---