आयपीएलच्या १३ व्या हंगामाला यूएईमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचे सर्व सामने जबरदस्त झाले. आतापर्यंतच्या आयपीएल सामान्यांचा विचार केला तर त्यात फलंदाज यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. आयपीएलच्या इतिहासात फलंदाजांनी आतापर्यंत अनेक जबरदस्त खेळी साकारल्या आहेत. आयपीएलमध्ये ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, विराट कोहली, युसुफ पठाण, ब्रेंडन मॅक्यूलम आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्यासह अनेक स्फोटक फलंदाजांनी आयपीएलमध्ये तुफानी खेळी केल्या आहेत.
आयपीएलमध्ये फलंदाज अनेकदा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात. ते चौकार-षटकार ठोकून गोलंदाजांवर हावी होतात. यामुळेच या स्पर्धेमधील गोलंदाजांना योग्य लाइन-लेंथने गोलंदाजी करावी लागते.
आयपीएलमध्ये बर्याचदा असे घडले आहे की एखाद्या फलंदाजाने गोलंदाजाच्या एका षटकात बऱ्याच धावा केल्या आणि ते षटक आयपीएलमधील सर्वात महागडे षटक ठरले. या लेखात अशाच गोलंदाजांविषयी जाणून घेऊ ज्यांनी आयपीएलच्या एका षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत.
आयपीएलच्या एका षटकात सर्वाधिक धावा देणारे हे ७ गोलंदाज
७. लुंगी एन्गिडी – ३० धावा
या यादीमध्ये ७ व्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आहे. यंदाच्या आयपीएल २०२० च्या हंगामात शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात लुंगी एन्गिडीने एका षटकात ३० धावा खर्च केल्या. या सामन्यात लुंगी एन्गिडीने चेन्नईकडून शेवटचं षटक टाकले त्यात जोफ्रा आर्चरने जबदस्त फलंदाजी करत ४ षटकार ठोकून ३० धावा कुटल्या.
६. ख्रिस जॉर्डन – ३० धावा
किंग्ज इलेव्हन पंजाबचा आघाडीचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने देखील आयपीएल २०२० मध्ये हा विक्रम केला आहे. दिल्ली कॅपिटल्सशी झालेल्या सामन्यादरम्यान त्याने २० व्या षटकात ३० धावा दिल्या. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोईनिसने त्याच्या चेंडूंवर चौकार-षटकार ठोकले. या षटकात स्टोइनिस आणि एन्रीच नॉर्किए यांनी एकूण ३० धावा ठोकल्या.
५. अशोक दिंडा – ३० धावा
वेगवान गोलंदाज अशोक दिंडासुद्धा या यादीमध्ये समाविष्ट आहे. २०१७ च्या आयपीएल हंगामात अशोक दिंडा राईझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा एक भाग होता आणि त्या मोसमात पुणे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. त्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिंडा खूपच महाग ठरला. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने त्याच्या या षटकात ३० धावा काढल्या.
४. राहुल शर्मा – ३१ धावा
या यादीत चौथ्या क्रमांकावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा माजी फिरकी गोलंदाज राहुल शर्माचे नाव आहे. आयपीएल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत ख्रिस गेलने राहुल शर्माच्या षटकात एकूण ३१ धावा केल्या. त्या षटकात त्याने ५ षटकार ठोकले.
३. रवी बोपारा – ३३ धावा
ख्रिस गेल आयपीएल २०१० च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा सदस्य होता. स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात केकेआरचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाशी झाला. केकेआरच्या डावा दरम्यान ख्रिस गेलने १३ व्या षटकात रवी बोपाराविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. ख्रिस गेलने बोपाराच्या त्या षटकात ४ षटकार ठोकत एकूण ३३ धावा ठोकल्या.
२. परविंदर आवाना – ३३ धावा
२०१४ च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्या मोसमात दुसऱ्या क्वालिफायरमध्ये चेन्नईचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी होता. वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करून पंजाब संघाने २२६ धावांची विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर पंजाबकडून परविंदर अवानाने डावाच्या सहाव्या षटकात गोलंदाजी केली आणि सुरेश रैनाने त्याच्या षटकात एकूण ३३ धावा फटकावल्या. सुरेश रैनाने त्या षटकात ५ चौकार आणि २ षटकार लगावले त्यात एक अवांतर चेंडू (नो बॉल) मिळाला.
१. प्रशांत परमेश्वरन – ३७ धावा
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक प्रशांत परमेश्वरन याने टाकले आहे. ८ मे २०११ रोजी, आयपीएलच्या चौथ्या सत्रात कोची टस्कर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाशी सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना कोचीचा संघ ९ गाडी गमावून १२५ धावा करू शकला.
लक्ष्यचा पाठलाग करताना आरसीबीकडून गेलने डावाच्या तिसर्या षटकात प्रशांत परमेश्वरनविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. गेलने त्या षटकात ४ षटकार आणि ३ चौकार ठोकत एकूण ३७ धावा केल्या. त्यात एक अवांतर चेंडू (नो बॉल) मिळाला होता.