क्रिकेटमध्ये अनेक परिवार असे आहेत, ज्यांच्या कुंटूंबातील अनेक सदस्य या ना त्या प्रकारे क्रिकेटशी जोडले गेले. अनेक क्रिकेटपटूंचे हिरो हे त्यांचे वडिलचं राहिले.
क्रिकेटमध्ये वडिल- मुलगा, भाऊ- भाऊ किंवा चुलता- पुतणे असे अनेक क्रिकेट खेळले आहेत. या लेखात आपण जे वडिल व मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत त्यांची माहिती करुन घेणार आहोत. Father-Son pairs to have played international cricket.
८. ख्रिस ब्राॅड- स्टुअर्ट ब्राॅड
ख्रिस ब्राॅड हे इंग्लंडकडून१९८४ ते १९८९ या काळात २५ कसोटी व ३४ वनडे सामने खेळले. २५ कसोटीत त्यांनी ३९.५४च्या सरासरीने १६६१ धावा तर ३४ वनडेत ४०.०२च्या सरासरीने १३६१ धावा केल्या. खेळाडू म्हणून कारकिर्द जरी छोटी असली तरी ख्रिस ब्राॅड यांनी २००३ ते २०२० या काळात तब्बल ५२९ सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सर्वाधिक सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांत ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
त्यांचा मुलगा स्टुअर्ट ब्राॅडने २००६साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आजपर्यंत त्याने १३८ कसोटी सामन्यात २८.५०च्या सरासरीने ४८५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ३२११ धावाही केल्या आहेत. वनडेत १२१ सामने खेळताना १७८ विकेट्स व ५२९ धावा त्याने केल्या आहेत.
ख्रिस ब्राॅड यांचे वय सध्या ६२ वर्ष असून स्टुअर्ट ब्राड हा ३४ वर्षांचा आहे.
७. वॉल्टर हॅडली- रिचर्ड्स हॅडली
ज्यांच्या नावाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड यांच्यादरम्यान चॅप्पेल- हॅडली कसोटी मालिका खेळवली जाते, त्या हॅडली कुटुंबाचे प्रमुख अर्थात वॉल्टर हॅडली. त्यांनी न्यूझीलँड कडून ११ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ५४३ धावा केल्या. त्यांना ५ मुले होती त्यातील ३ मुले देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली.
त्यातील धाकटा मुलगा अर्थात रिचर्ड्स हॅडली यांनी १९७३-१९९० या काळात तब्बल ८६ कसोटी सामन्यात न्यूझीलँडकडून ४३१ धावा करताना ३०००धावा केल्या. वॉल्टर हॅडली यांचे दुसरे पुत्र डेल हॅडली यांनी २६ कसोटी देशासाठी खेळल्या. त्यात त्यांनी ५३० धावा ७१ बळी घेतले. वॉल्टर हॅडली यांचे थोरले पुत्र बॅरी हॅडली यांना मात्र देशाकडून फक्त २ एकदिवसीय सामने खेळता आले. त्यांना देशाकडून कसोटी सामने खेळण्याचं भाग्य लाभलं नाही.
६. लान्स क्रेन्स- ख्रिस केन्स
न्यूझीलंड क्रिकेटची या बाप लेकाच्या जोडीने मोठी सेवा केली. वडिल लान्स क्रेन्स यांनी १९७४ ते १९८५ या काळात ४३ कसोटीत ३२.९२च्या सरासरीने १३० विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत ७८ सामन्यात ३०.५२च्या सरासरीने ८९ विकेट्स घेतल्या. गोलंदाज असलेल्या लान्स क्रेन्स यांचा मुलगा ख्रिस क्रेन्स मात्र अष्टपैलू खेळाडू ठरला. तो एक चांगला स्फोटक फलंदाज व चांगला गोलंदाज राहिला.
क्रेन्सने १९८९८ ते २००४ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यात ६२ कसोटी सामने खेळले असून ३३.६३ च्या सरासरीने ३३२०धावा तर २९.४०च्या सरासरीने २१८ विकेट्स घेतल्या.वनडेत त्याने २१५ सामन्यात२९.४६च्च्या सरासरीने ४९५० धावा व ३२.८०च्या सरासरीने २०१ विकेट्स घेतल्या आहेत.
लान्स क्रेन्स यांचे सध्या वय ७० वर्ष असून ख्रिस केन्स ५० वर्षांचा आहे. २०१४मधील एका वृत्तानुसार कमाईसाठी बसस्टाॅप धुण्याचे व साफसफाईचे काम करत होता.
५. जेफ मॉर्श- मिचेल माॅर्श, शेन माॅर्श
जेफ मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून १९८५ ते १९९२ या काळात बरोबर ५० कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी २८५४ धावा केल्या. तसेच वनडेत ११७ सामन्यात ३९.९७च्या सरासरीने २८५४ धावा केल्या आहेत. नंतर त्यांनी प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते २०१४ मध्ये केवळ तिसरे क्रिकेटपटू ठरले ज्यांच्या २ मुलांनी देशासाठी क्रिकेट खेळले.
त्यांचा थोरला मुलगा शॉन मार्श याने २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आजपर्यंत शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून ३८ कसोटी सामने खेळले असून ३४.३१ च्या सरासरीने २२६५ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ७३ सामन्यात ४०.७७च्या सरासरीने २७७३ धावा केल्या आहेत.
जेफ मार्श यांचा दुसरा मुलगा मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने ऑस्ट्रेलियाकडून ३२ कसोटी सामन्यात १२६० धावा करताना ४२ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत. वनडेत त्याने ५७ सामन्यात ३४.९७ च्या सरासरीने १५३९ धावा केल्या आहेत.
जेफ माॅर्श हे सध्या ६१ वर्षांचे, शाॅन माॅर्श सध्या ३६ वर्षे तर मिचेल माॅर्श सध्या २८ वर्षांचा आहे. विशेष म्हणजे जेफ मार्श यांची मुलगी मेलिसा मार्श ही बास्केटबॉल खेळाडू होती.
४. राॅजर बिन्नी- स्टुअर्ट बिन्नी
भारतीय क्रिकेट संघात राॅजर बिन्नी यांचे वेगळेच स्थान होते. १९८३ विश्वचषक विजयातील ते एक शिल्पकार होते. संपुर्ण स्पर्धेत त्यांनी १८ विकेट्स घेतल्या होत्या. १९८५ वर्ल्ड सिरीज चॅंपियनशीप स्पर्धेत त्यांनी १७ विकेट्स घेतल्या होत्या. भारताकडून बिन्नी १९७९ ते १९८७ या काळात क्रिकेट खेळले. २७ कसोटी सामन्यात त्यांनी २३.०५च्या सरासरीने ८३० धावा तर ३२.६३च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या. वनडेत ७२ सामने खेळताना त्यांनी ६२९ धावा व ७७ विकेट्स घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी निवड समितीतही काम केले.
भारताकडून वनडे डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम राॅजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. स्टुअर्टने ४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला भारताकडून ६ कसोटी व १४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतु त्याला स्वत:ला सिद्ध करता आले नाही.
३६ वर्षीय स्टुअर्ट बिन्नी २०१६मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून २०२० हंगामात तो नागालॅंड संघाकडून रणजी सामने खेळला आहे. राॅजर बिन्नी यांचे सध्याचे वय ६५ वर्ष आहे.
३. सुनिल गावसकर- रोहन गावसकर
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा १० हजार धावा करणारे लिटील मास्टर सुनिल गावसकर हे भारताकडून १९७१ ते १९८७ या काळात तब्बल १२५ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ५१.१२च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या. वनडेतही त्यांनी १०८ सामन्यात ३५.१३च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गावसकर एकूण ३४८ सामने खेळले. त्यात त्यांनी २५८३४ धावा केल्या. त्यांचा मुलगा रोहनचा जन्म २० फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. गावसकर त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते.
रोहनने भारताकडून एकूण ११ वनडे सामने खेळले. २००४मध्ये खेळलेल्या या ११ सामन्यात १८.८७च्या सरासरीने जेमतेम १५१ धावा व १ विकेट घेतली. रोहनला मुंबईकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. यावरुन त्यावेळच्या मुंबई संघातील स्पर्धा लक्षात येते. रोहन तब्बल ११७ प्रथम श्रेणी सामने बंगाल संघाकडून खेळला. त्यात त्याने ४४.१९च्या सरासरीने ६९३८ धावा केल्या. सुनिल गावसकरांचे सध्या वय ७० वर्ष २६७ दिवस असून रोहनचे वय ४४ वर्ष आहे.
२. विजय मांजरेकर- संजय मांजरेकर
१९३१ साली जन्म झालेले विजय मांजरेकर १९५२ ते १९६५ या काळात भारताकडून ५५ कसोटी सामने खेळले. ९२ डावात फलंदाजी करताना त्यांनी ३९.१२च्या सरासरीने ३२०८ धावा केल्या. त्यांचा मुलगा संजय विजय मांजरेकरचा जन्म १२ जुलै १६६५ला झाला. संजय भारताकडून १९८७ ते १९९६ या काळात ३७ कसोटी व ७४ वनडे सामने खेळला. संजयने ३७ कसोटीत ३७.१४च्या सरासरीने २०४३ तर ७४ वनडेत ३३.२३च्या सरासरीने १९९४ धावा केल्या. हे दोघेही बाप- लेक मुंबईकडून मात्र मोठ्या प्रमाणावर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. विजय मांजरेकर १९८ प्रथम श्रेणी सामने तर संजय मांजरेकर १४७ प्रथम श्रेणी सामने खेळले
वयाच्या ५२व्या वर्षी १९८३मध्ये विजय मांजरेकरांचा मृत्यु झाला. ते संजय मांजरेकरांनी भारताकडून खेळलेला एकही सामना पाहु शकले नाहीत. संजय मांजरेकरही भारताकडून खूप काळ क्रिकेट खेळू शकले नाहीत. परंतु त्यांनी समालोचक म्हणून चांगली कारकि्र्द घडवली. संजय मांजरेकर सध्या ५२ वर्ष व २६५ दिवसांचे आहेत.
१. लाला अमरनाथ- मोहिंदर अमरनाथ, सुरिंदर अमरनाथ
लाला अमरनाथ हे भारताकडून हे भारत स्वातंत्र्य झाल्यांनंतरचे भारताचे पहिले कर्णधार. त्यांनी २४ कसोटी सामन्यांत ८७८ धावा करताना ४५ विकेट्स घेतल्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पाहिलं शतक करण्याचा मान हा लाला अमरनाथ यांना जातो. त्यांनी विश्वयुद्धापूर्वी ३ आणि नंतर २१ असे एकूण २४ सामने खेळले होते.
त्यांचे थोरले पुत्र सुरिंदर अमरनाथ भारताकडून १० कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीमध्ये ५५० तर एकदिवसीय सामन्यात १०० धावा केल्या.
लाला अमरनाथ यांचे दुसरे पुत्र मोहिंदर अमरनाथ यांना भारतीय क्रिकेटमधील दिग्गज माजी क्रिकेटपटूंपैकी एक समजले जाते. ६९ कसोटी आणि ८५ एकदिवसीय सामने ते भारताकडून खेळले. १९८३ साली भारत जेव्हा प्रथम विश्वचषक जिंकला तेव्हा मोहिंदर अमरनाथ हे मालिकावीर ठरले होते. कसोटीमध्ये १७८२ धावा आणि ३१ विकेट्स तर एकदिवसीय सामन्यांत १९७१ धावा आणि ४६ विकेट्स अशी आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची कामगिरी राहिली आहे.
त्यांचे तिसरे पुत्र राजिंदर अमरनाथ मात्र भारताकडून खेळू शकले नाही. त्यांनी हरियाणाकडून ३६ प्रथम श्रेणी तर १ अ दर्जाचा सामना खेळला.
२०११ विश्वचषक विशेष-
–धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
–२०११ विश्वचषक विजयातील केवळ एक हिरो आहे सध्याच्या टीम इंडियाचा सदस्य
–तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
–आठवण – भारताच्या विश्वविजयाची
–गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
–का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?