इंग्लंडचा संघ सध्या भारत दौर्यावर असून उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमने-सामने येतील. या वनडे मालिकेसाठीच्या भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
या संघात सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या या तीन खेळाडूंना प्रथमच संधी देण्यात आली आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यावरील वनडे मालिकेत संघात सामील असलेल्या तब्बल ७ खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून मात्र वगळण्यात आले आहे. यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन खेळाडूंना संधी न देताच मिळाला डच्चू
ऑस्ट्रेलिया दौर्यावरील वनडे संघात सामील असलेल्या एकूण सात खेळाडूंना आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाहिये. यात मयंक अगरवाल, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. यातील जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नाहिये, तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरले नाहियेत.
उर्वरित खेळाडूंपैकी मयंक अगरवालबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याला दोन सामन्यात संधी मिळाली होती, ज्यात त्याने एकूण ५० धावा केल्या होत्या. २८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचवेळी नवदीप सैनीबाबत बोलायचे झाल्यास हा वेगवान गोलंदाज विशेष प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला होता. त्याने ऑस्ट्रेलिया दौर्यावर एकूण १७ षटके टाकतांना ९च्या इकॉनॉमी रेटने १५३ धावा दिल्या होत्या. यात केवळ एक गडी बाद करण्यात त्याला यश आले होते. इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेतही तो संघाचा भाग आहे, मात्र त्याला अद्याप अंतिम अकराच्या संघात स्थान मिळाले नाहिये.
मात्र या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया दौर्यावर एकही वनडे सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या संजू सॅमसन आणि मनीष पांडेला मात्र संघातून वगळण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलिया दौर्यावर दुखापतीमुळे संघाचा भाग नसलेल्या रोहित शर्माचे मात्र संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या शिवाय रिषभ पंत, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनाही वनडे संघात पुन्हा एकदा जागा मिळविण्यात यश आले आहे.
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
महत्वाच्या बातम्या:
बाबर आझमच्या अडचणीत वाढ, या प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश
INDvENG: संघ अडचणीत असताना का मैदानाबाहेर गेला कर्णधार कोहली? स्वत:च केला खुलासा






