मुंबई:- हिमाचल प्रदेशने “७०व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” विजेतेपद पटकाविले. त्यांचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे तिसरे जेतेपद. बिहार येथे झालेल्या ६४व्या, आणि हरियाणा(चरखी – दादरी) येथे झालेल्या ६८व्या राष्ट्रीय स्पर्धेत ते विजयी ठरले होते. गत राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणा कडून पराभूत झाल्याने ते उपविजयी राहिले होते. रूप नगर, पंजाब येथील लामरीन टेक स्किल महाविद्यालयाच्या पटांगणातील शामियानात झालेल्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेश भारतीय रेल्वेचा प्रतिकार ३७-२८ असा ९ गुणांनी मोडून काढत विजेतेपदाला गवसणी घातली. पुष्पा राणी, ज्योती सिंग यांच्या धूर्त चढायाना भावना देवी, साक्षी शर्मा यांची बचावाची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय मिळविता आला.
याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेने राजस्थानचा ३३-२३ असा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघानी संघर्षपूर्ण लढत देऊन देखील उपांत्य फेरीत गत उपविजेत्या हिमाचल प्रदेश कडून ३०-३९ असा ९गुणांनी पराभव पत्करला. हिमाचलने आक्रमक सुरुवात करीत सलग ४ गुण घेत सुरुवातच जोरदार केली. महाराष्ट्राच्या सलोनी गजमलने चढाईत गुण घेत महाराष्ट्राचे खाते उघडले. पण पाचच मिनिटात पहिला लोण देत हिमाचलने १२-०४ अशी आघाडी घेतली. विश्रांतीला २३-०९ अशी भक्कम आघाडी हिमाचालकडे होती. उत्तरार्धात पुन्हा एक लोण देत २८-११अशी आपली आघाडी वाढविली. त्यानंतर मात्र जोरदार प्रतिहल्ला करीत महाराष्ट्राने जोषपूर्ण खेळ केला. आम्रपालीने ३गडी टिपत आणि हरजितने चवडे काढून केलेल्या काही पकडी यामुळे पहिला लोण देत महाराष्ट्राने ही आघाडी२३-३२ अशी कमी केली. पुन्हा आम्रपालीने एका चढाईत ४गडी टिपत महाराष्ट्राच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण शिलकी तीन खेळाडूत आम्रपाली गडी न टिपता परत आली. येथेच घात झाला. हा लोण जर महाराष्ट्र हिमाचलवर देऊ शकला असता, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.
पूर्वार्धाच्या खेळात आम्रपाली व हरजीत दबावाखाली खेळताना दिसल्या. या डावात एकटी सलोनीला चढाईत गुण मिळविण्यात यश येत होते. आम्रपालीने आपल्या चढाईची बाजू बदलून देखील गुण मिळविण्याचा प्रयत्न केला पण त्यात देखील तिची पकड झाली. शेवटी तिने आपल्या नेहमीच्या शैलीत खेळत महाराष्ट्राला विजय समीप आणले होते. पण शेवटी चार खेळाडूत झालेली तिची पकड महाराष्ट्राला विजयापासून दूर घेऊन गेली. ज्योती सिंग,पुष्पा राणा यांच्या जोषपूर्ण चढाया त्याला भावनादेवी, साक्षी शर्मा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हिमाचलने विजय मिळविला. महाराष्ट्राकडून आम्रपाली गलांडे, हरजीत कौर, सलोनी गजमल यांनी कडवी लढत दिली.
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेस बेलवलकर बॉबकॅट्स, लायन्स संघांचा तिसरा विजय
राजकोटमध्ये घडला इतिहास, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच खेळणार हरियाणा