---Advertisement---

असे क्रिकेटर होणे नाही! जखमी अवस्थेत देशासाठी मैदानावर उतरलेले ५ दिग्गज खेळाडू

On: गुरूवार, जून 4, 2020 9:22 AM
---Advertisement---

कोणताही खेळ म्हटले तरी खेळाडूच्या आयुष्यात दुखापती हा अविभाज्य भाग आहे. यात क्रिकेटपटूंचाही समावेश होतो. अनेक क्रिकेटपटूंना आत्तापर्यंत दुखापतींमुळे त्रास सहन करावा लागला आहे, शस्त्रक्रिया करुन घ्याव्या लागल्या आहेत. पण असे असले तरी असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी सामना सुरु असताना जखमी झाल्यानंतरही संघहिताला प्राधान्य देत मैदानात उतरुन खेळ केला आहे. अशाच काही क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

जखमी अवस्थेतही मैदानात उतरलेले क्रिकेटपटू – 

अनिल कुंबळे –

२००२मध्ये अँटिग्वा येथे भारत विरुद्ध विंडीज यांच्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेचा जबडा तुटला होता. पण तरीही त्याने गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात कुंबळे पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मार्वन ढिल्लनचा चेंडू जबड्याला लागला. त्यावेळी रक्त येत असतानाही कुंबळेने फलंदाजी केली.

पण जेव्हा पहिला डाव संपला तेव्हा त्याच्या जबड्याला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला उर्वरित मालिकेत सहभागी होणार नव्हते. असे असतानाही या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला मैदानात आपल्या सहकाऱ्यांना खेळताना पाहून ड्रेसिंग रुममध्ये रहावेना. त्यामुळे त्याने गोलंदाजी करण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला.

त्याने त्यादिवशी जबडा हलणार नाही याची काळजी घेण्यासाठी बँडेज बांधले आणि गोलंदाजी केली. त्याने तब्बल १४ षटके गोलंदाजी केली. तसेच त्याने विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराची विकेटही घेतली होती. मात्र त्यानंतर त्याला भारतात परतावे लागले.

Photo Courtesy: Twitter/BCCI

उन्मुक्त चंद –

२०१८ ला दिल्ली विरुद्ध उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात उन्मुक्त चंदने जबडा तुटला असतानाही शतकी खेळी केली होती. सामना सुरु होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना तो जखमी झाला. त्यानंतर काही वेळातच सामना सुरु झाला. परंतु चंदने सामना खेळायला प्राधान्य देताना संघहित काय असते हे दाखवून दिले.

सलामीला आलेल्या चंदने १२५ चेंडूत ११६ धावांची खेळी करताना १२ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून ३०७ धावांची खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने उत्तरप्रदेशला ५५ धावांनी नमवले.

ग्रॅमी स्मिथ –

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा २००९मध्ये सिडनी कसोटीत पहिल्या डावात एक हात मोडला असताना संघासाठी दुसऱ्या डावात आणि सामन्यातील चौथ्या डावात १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५धावांचा डोंगर उभा केला. स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात फलंदाजीला आला परंतु तो ३० धावांवर खेळत असताना मिचेल जॉन्सनचा तब्बल ताशी १४३ किलोमीटरने आलेला चेंडू स्मिथच्या हातावर लागला. त्यानंतर त्याने मैदान सोडले.

तो परतला असतानाही दक्षिण आफ्रिकेने एका बाजूने किल्ला चांगला लढवताना सर्वबाद ३२७ धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपला डाव ४ बाद २५७ धावांवर घोषित केला. आणि आफ्रिकेसमोर चौथ्या दिवशी ३७६ धावांचे लक्ष ठेवले.

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दिवशी हा सामना वाचवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ८.२ षटके फलंदाजी करण्याची गरज होती. मैदानात ९व्या विकेटच्या रूपात एंटीनी आणि स्टेन खेळत होते. परंतु जेव्हा स्टेन बाद झाला तेव्हा सर्वांना वाटले की ऑस्ट्रेलिया जिंकली आहे आणि स्मिथ हात मोडल्यामुळे फलंदाजीला येणार नाही. परंतु असे झाले नाही आणि स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

यावेळी त्याला मैदानावरील प्रेक्षकांनी उठून टाळ्यांच्या गजरात खास स्वागत केले. विशेष म्हणजे एक हात मोडला असतानाही स्मिथ तब्बल २६ चेंडू खेळला. परंतु जेव्हा सामना वाचवण्यासाठी ११ चेंडू खेळण्याची गरज होती तेव्हा तब्बल ताशी १४५ किलोमीटरने आलेल्या मिचेल जॉन्सनच्या चेंडूचा स्मिथला एका हाताने सामना करता आला नाही आणि त्याच्या यष्टीचा जॉन्सनच्या चेंडूने वेध घेतला.

तमिम इक्बाल –

१४ व्या एशिया कप स्पर्धेत पहिलाच सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात पार पडला होता. या सामन्यादरम्यान बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तमिम इक्बालच्या डाव्या मनगटाला चेंडू लागल्याने फ्रॅक्चर झाले होते.

मात्र दुखापतग्रस्त असतानाही बांगलादेशची ९ वी विकेट गेल्यानंतर तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि आपली विकेट वाचवत शतक करणाऱ्या मुस्तफिकुर रहिमबरोबर ३२ धावांची भागीदारीही रचली. तसेच बांगलादेशला २६१ धावांचा टप्पा गाठून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

फलंदाजीला येताना त्याने डाव्या हाताच्या ग्लोव्हला विशेष पॅडचा आधार दिला होता.जेणेकरुन त्याला खेळता येईल. त्याने यावेळी एकाच हाताने फलंदाजी करताना एकच चेंडू खेळला आणि एकही धाव केली नाही. पण त्याने दुखापत असतानाही संघहिताला प्राधान्य दिल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले होते.

https://twitter.com/BipLobMahmuD_/status/1040997724605358087

शेन वॉट्सन – 

२०१९ च्या आयपीएल मोसमाचा अंतिम सामना खेळताना चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनच्या मांडीला दुखापत झाली होती. मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मांडीला दुखापत झाल्याने रक्त येत असतानाही वॉट्सनने सर्वाधिक ८० धावा केल्या होत्या. तो या सामन्यात शेवटच्या षटकात बाद झाला.

वॉट्सनने एवढे धैर्य दाखवूनही चेन्नईला मात्र मुंबई इंडियन्स विरुद्ध केवळ १ धावेने पराभूत व्हावे लागले होते. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने चौथ्यांचा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले होते. मात्र या सामन्यानंतर वॉट्सनला त्याच्या मांडीला ६ टाकेही घालावे लागले होते.

https://twitter.com/imssmbfan/status/1127991705431470081?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1127991705431470081&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fshane-watson-injured-ipl-final-sticthes-knee-csk-mi%2F

इयान बेल – 

२०१० ला इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात ब्रिस्टोल येथे वनडे सामना पार पडला होता. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा खेळाडू इयान बेलच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. पण तरीही तो फलंदाजीसाठी उतरला होता.

या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडला २३७ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना २२७ धावांवर असताना इंग्लंडची ९ वी विकेट पडली. त्यामुळे अनेकांना वाटले की झाला सामना संपला आणि बांगलादेश जिंकले. पण त्याचवेळी पाय फ्रॅक्चर असतानाही बेल ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

त्यावेळी इंग्लंडला १० धावांची गरज होती आणि १ विकेट हातात होती. तर जोनाथन ट्रॉट ९० धावांवर खेळत होता. यावेळी मॉर्गन त्याचा रनर म्हणून आला होता. यावेळी ट्रॉटने २ वेळा दुहेरी धावा काढल्या. पण त्यानंतर पुढच्या चेंडूवर ९४ धावांवर असताना तो बाद झाला. त्यामुळे बांगलादेशने हा सामना ५ धावांनी जिंकला. पण यावेळी बेलला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नसला तरी त्याने संघहितासाठी दाखवलेल्या धैर्याचे सर्वांनी कौतुक केले.

माल्कम मार्शल –

१९८४ ला हेडिंग्ले येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी सामना झाला होता. या सामन्यात पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल यांच्या डाव्या हाताचा आंगठा दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २७० धावा केल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची तिसऱ्या दिवशी ९ बाद २९० धावसंख्या असताना मार्शल फलंदाजीसाठी आले. त्यावेळी लॅरी गोम्स ९६ धावावर नाबाद होते. सर्वांना वाटले वेस्ट इंडिजचा डाव संपला मात्र मार्शल त्यावेळी मैदानात आले आणि त्यांनी गोम्स यांना चांगली साथ दिली. यावेळी मार्शल यांनी एका हाताने फलंदाजी केली. गोम्स यांनी त्यांचे शतकही पूर्ण केले पण मार्शल ४ धावा केल्यानंतर बाद झाले.

पण खरा कारनामा तर त्यांनी नंतर केला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ते केवळ क्षेत्ररक्षणासाठीच नाही तर गोलंदाजी करण्यासाठीही मैनादात उतरले. उजव्या हाताचे गोलंदाज असलेल्या मार्शल यांनी अशावेळी २६ षटके गोलंदाजी करताना ५३ धावा देत चक्क ७ विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा डाव १५९ धावांवरच संपुष्टात आला. त्यानंतर वेस्ट इंडिजने १२८ धावांचे आव्हान ३३ षटकांच्या आतच पार करत हा सामना ८ विकेट्सने सहज जिंकला.

गॅरी कर्स्टन – 

२००३ ला लाहोर येथे पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून गॅरी कर्स्टन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आले. यावेळी ५३ धावांवर खेळत असताना कर्स्टन यांच्या नाकाजवळ शोएब अख्तरचा वेगाने आलेला चेंडू लागला. यावेळी कर्स्टन पूल मारण्याचा प्रयन्त करत होते. पण तो चेंडू त्यांच्या तोंडावर आदळला. त्यामुळे त्यांना रिटायर्ड हर्ट होऊन जावे लागले.

त्यावेळी त्यांना जबरदस्त मार लागला होता. तसेच त्यांचे नाक फ्रॅक्चर झाल्याचेही निदान झाले होते. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३२० धावांवर संपला. तर पाकिस्तानने पहिल्या डावात ४०१ धावा करत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात १४९ धावांवर ४ विकेट गेल्या असताना कर्स्टन यांनी फलंदाजीला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते मैदानात आले.

त्यावेळी चेहऱ्याला लागल्याने त्यांना ओळखताही येत नव्हते. पण त्यांनी त्या जखमी अवस्थेतही ४६ धावांची खेळी केली. पण दक्षिण आफ्रिकेच्या ७ व्या विकेटच्या रुपात ते बाद झाले. पुढे हा सामना पाकिस्तानने ८ विकेट्सने सहज जिंकला.

ट्रेंडिंग लेख – 

टी२०मध्ये डाॅट बाॅल टाकणं नाही सोप्पं, या गोलंदाजांनी केलाय चक्रावुन टाकणारा कारनामा

जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या

एबी, फिंच या परदेशी खेळाडूंशिवाय बेंगलोरची टीम अशी होईल राॅयल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---