भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा टी -२० सामना मंगळवारी (२७ जुलै ) खेळला जाणार होता. परंतु, सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा सामना एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. परंतु, आता भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी पुन्हा समोर आली आहे.
मंगळवारी (२७ जुलै) दुसरा टी२० सामना सुरू होण्यापूर्वी कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बीसीसीआयच्या एका सूत्राने मंगळवारी सांगितले होते की, त्याच्या संपर्कात आलेल्या ८ भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणीही निगेटीव्ह आली आहे. हे खेळाडू दुसऱ्या टी -२० सामन्यासाठी उपलब्ध असतील.
परंतु, ईएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध बुधवारी (२८ जुलै) मैदानावर उतरू शकणार नाही. त्यांना सध्या पुढील काही निर्णय घेईपर्यंत आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. दुसरा टी -२० सामना बुधवारी (२८ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.(8 players who were in close contact with krunal Pandya, cannot travel to the ground for the final two T20 matches)
तसेच, स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार जे ८ खेळाडू कृणाल पंड्याच्या संपर्कात आले आहेत, ते खेळाडू म्हणजे युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन, पृथ्वी शॉ, कृष्णप्पा गौतम आणि मनीष पांडे. जर हे ८ मुख्य खेळाडू श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात खेळले नाही तर, भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. या दौऱ्यावर बीसीसीआयने २० खेळाडूंचा संघ रवाना केला होता. तसेच ४ नेट गोलंदाजांचाही समावेश आहे.
पण अजून बीसीसीआयकडून कृणालच्या संपर्कात आलेले हे ८ खेळाडू उर्वरित टी२० मालिकेत खेळणार की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ३० जुलैला भारतात परतणार आहे. परंतु, कोरोनाची लागण झालेला कृणाल पंड्या ३० जुलैला मायदेशी परतणार नाही. त्याला त्याच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह येईपर्यंत श्रीलंकेतच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
यासह सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही खेळाडूंची ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. टी२० मालिका संपल्यानंतर लगेच हे खेळाडू इंग्लंडला रवाना होणार होते. परंतु, आता ते केव्हा जातील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आता वेळ इंग्लंडविरुद्ध दोन हात करण्याची! ‘विराटसेना’ डरहॅममध्ये गाळतीये घाम, फोटो भन्नाट व्हायरल
निराशा आणि फक्त निराशा! तिरंदाजीतील पराभवामुळे तरुणदीप राय ऑलिंपिकमधून बाहेर