भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका पार पडली आहे.ॲडलेड येथे पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात युवा खेळाडूंनी विशेष महत्वाची भूमिका बजावली.
प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर सारख्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या सर्वांनीच दमदार कामगिरी केली. यात विशेषतः युवा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या खेळातून सर्वच क्रिकेट रसिकांची वाहवा मिळवली आहे. मालिका संपल्यानंतर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात गिल संदर्भातला एक मजेशीर प्रसंग उलगडला आहे.
अश्विन म्हणाला, “मी शुभमन गिलच्या बॅटिंगचा फार मोठा फॅन आहे. मेलबर्न कसोटी सामन्यादरम्यानचा एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो. आम्ही बॉलिंग करत होतो व पीच पूर्णतः बॅटिंगसाठी अनुकूल झाली होती. मी पॅट कमिन्स विरुद्ध गोलंदाजी करत होतो, जो मैदानावर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा आम्ही कॅमेरून ग्रीनला बाद केले तेव्हा गिल माझ्या कडे पळत आला आणि म्हणाला, अॅश भाई लवकर यांना बाद करा. जर 40-50 धावा करायच्या असतील तर त्या मी 5 षटकात पूर्ण करेन. मला हे फारच विशेष वाटले की, एक पदार्पण करणारा खेळाडू आमच्याकडे येऊन म्हणतोय की लवकर बाद करा, मी 5 षटकात सामना संपवेल. मला हे खरोखरच अविश्वसनीय वाटले होते.”
अश्विनने सांगितल्याप्रमाणे गिलमध्ये संपूर्ण मालिकेत आत्मविश्वास जाणवत होता. त्याने संपूर्ण ऑस्ट्रेलियात दौऱ्यात शानदार कामगिरी केली. मेलबर्न कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या गिलने एकूण 6 डावात 2 अर्धशतकांसह 259 धावा केल्या.गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.आत्मविश्वास वाढलेल्या गिलकडून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत देखील उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
सौरव गांगुली यांच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट आले समोर, या दिवशी मिळणार डिस्चार्ज
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय