भारतीय संघातील क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांचा कॉफी विथ करन या शोमधील एपिसोड रविवारी(6 जानेवारी) प्रसारित झाला. या शोमध्ये त्यांनी केलेल्या विवादात्मक विधानांवर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टिका झाली आहे.
पण आता या दोघांच्याही अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीचे अध्यक्ष विनोद राय यांनी राहुल आणि पंड्यावर दोन वनडे सामन्यांची बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली आहे. पण सीएओच्या सदस्या डायना एडुलजी यांनी हे प्रकरण बीसीसीआयच्या लीगल सेलकडे पाठवले आहे.
राहुल आणि पंड्या यांनी महिलांबद्दल या शोमध्ये काही विवादात्मक विधाने केली होती. त्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या या विधानांबद्दल पंड्याने माफी मागितली आहे. तसेच अशी चूक पुन्हा होणार नसल्याचे म्हटले आहे.
याबद्दल बोलताना राय म्हणाले, ‘मी हार्दिकने दिलेल्या स्पष्टीरणाने संतुष्ट नाही. मी या दोन्ही खेळाडूंवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीसाठी शिफारस करत आहे. पण अंतिम निर्णय डायना यांनी संमती दिल्यानंतर घेतला जाईल.’
ते म्हणाले, ‘डायना यांनी दोन्ही खेळाडूंवर बंदी घालण्याबाबत कायदेशीर मतं मागितली आहे. त्यामुळे त्या जेव्हा त्यांची सहमती देईल तेव्हा अंतिम निर्णय घेतला जाईल. पण माझ्यासाठी या दोघांनी केलेली विधाने मुर्खपणाची आणि अस्वीकार्य आहेत.’
डायना यांनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचीही मतं मागितली आहेत.
या प्रकरणाबाबत राहुल आणि करन जोहर यांनी अजून कोणतेही भाष्य केलेले नाही. पण बीसीसीआयने पंड्या आणि राहुलला त्यांनी शोमध्ये केलेल्या विधानांबद्दल नोटीस पाठवली आहे. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे.
पंड्या आणि राहुल यांचा 12 जानेवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
–आयपीएल गाजवलेल्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा…
–जेव्हा ३४३ धावांचे लक्ष दिलेला संघ होतो ३५ धावांवर सर्वबाद