माजी भारतीय क्रिकेटपटू आणि खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडूंना आक्रमक क्रिकेट शिकवणारा कर्णधार म्हणून अनेकजण सौरव गांगुलीचे नाव घेतात. आपल्या १६ वर्षाच्या कारकिर्दीत गांगुलीने जागतिक आणि भारतीय क्रिकेटला अनेक सुवर्णक्षण दिले. परंतु एका गोष्टीसाठी गांगुली सुप्रसिद्ध म्हणा किंवा कुप्रसिद्ध होता. ती गोष्ट म्हणजे टीम मीटिंगमध्ये उशीरा येणे अथवा टॉससाठी उशीर करणे.
गांगुली कोलकात्याच्या एका गर्भश्रीमंत घरात जन्मला. त्यामुळे कदाचित, त्या विलासी जीवनाची त्याला सवय होती पण क्रिकेटच्या मैदानावर देखील ही सवय सुटली नाही. अनेक भारतीय खेळाडू त्याच्या या सवयीची तक्रार हसत हसत करताना दिसून येतात.
गांगुलीच्या या सवयीचा त्रास मात्र विरुद्ध संघाच्या कर्णधाराला भोगावा लागत. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू स्टीव्ह वॉ त्याच्या या सवयीचा पहिला बळी.
२००१ च्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेच्या नाणेफेकी वेळच्या काही घटना अशा रंजक होत्या.
गांगुली नुकताच भारतीय संघाचा कर्णधार झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार होती. ठरलेल्या वेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वॉ व सामनाधिकारी केमी स्मिथ मैदानावर हजर झाले आणि भारताचा कर्णधार सौरव गांगुलीची वाट पाहू लागले. दहा मिनिट झाले तरी गांगुली काय येईना ? वॉ वैतागला. त्यानंतर गांगुली पळत पळत आला आणि टॉसचा सोपस्कार पूर्ण केला.
या घटनेविषयी गांगुली सांगतो,
“मी तेव्हा नवीनच कर्णधार होतो. टॉससाठी वेळेवर जाण्यास मी बाहेर पडलो .मात्र, मला कोणीतरी सांगितले की, टॉससाठी जाताना ब्लेझर घालावा लागतो. त्यानंतर मी ब्लेझर शोधू लागलो. माझे कपडे बरेचसे अस्ताव्यस्त पडलेले म्हणून मला ब्लेझर लवकर सापडला नाही आणि पर्यायाने मी टॉससाठी उशिरा पोहोचलो.”
त्याच दौर्याच्या वनडे मालिकेत देखील असाच प्रकार झाला मात्र यावेळी गांगुलीने हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचे २००६ मध्ये सांगितले.
गांगुलीने कबूल केले की, “ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांचे स्वत: चेच औषध पाजण्याची योजना होती. तेव्हा कर्णधार म्हणून मी एक नवशिक्या होतो आणि स्टीव्हला अशा युक्त्या माहित होत्या. त्यांनी भारतात येण्यापूर्वी भारतीय खेळाडूंवर अनेक टिप्पण्या केल्या होत्या. कसोटी मालिका गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन कोच जॉन बुकानन चिडले होते. विशाखापट्टनमच्या वनडेआधी जवागल श्रीनाथ व बुकानन यांचा वाद झाला होता. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे ठरवले. मी जाणीवपूर्वक पंधरा मिनिटे उशिराने टॉससाठी गेलो.”
स्टीव्ह वॉने पुढे, आपल्या पुस्तकात उल्लेख केला की, गांगुलीने त्याला सात वेळा अशी वाट पाहायला लावली होती. मध्यंतरी, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांनीदेखील गांगुलीबद्दल हीच तक्रार केली. आता सुद्धा, तो कॉमेंट्री बॉक्समध्ये उशिरा येतो असेही गमतीने म्हणाला होता.
वाचा –
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…
सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियाचे चार गडी गारद करणारे ३ भारतीय गोलंदाज, एका दिग्गजाचाही समावेश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळलेल्या लक्ष्मणच्या पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्या