सध्या यूएईत १९ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट एशिया चषक (u19 asia cup 2021) खेळला जात आहे. या स्पर्धेत सोमवारी (२७ डिसेंबर) १९ वर्षाखालील भारतीय संघ (u19 team india) आणि १९ वर्षाखालील अफगाणिस्तान संघात सामना झाला. भारतीय संघाने या सामन्यात चार विकेट्स राखून विजय मिळवला. भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा एशिया चषकातील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले आहे. जुन्नरचा युवा क्रिकेटपटू कौशल तांबे हा या सामन्याचा सामनावीर ठरला.
भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अफगाणिस्तानने २६० धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सहा विकेट्सच्या नुकसानावर आणि १० चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार यश धूलने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात चार विकेट्सच्या नुकसानावर २५९ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानसाठी एजाज अहमदजईने सर्वाधिक ८६ धावांची नाबाद खेळी केली. या धावांमध्ये तब्बल ७ षटकारांचा समावेश होता. अहमदजई व्यतिरिक्त सुलेमान सफीने देखील ७३ धावांचे महत्वाची खेळी केली. तसेच अला नूरने २६ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंव्यतिरिक्त अफगाणिस्तानचा एकही खेळाडू २० धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने ४८.२ षटकात विजय मिळवला. भारतीय संघासाठी सलामीवीर हरनूर सिंगने सर्वाधिक ६५ धावांची केळी केली. या धावा करण्यासाठी हरनूरने ७४ चेंडू खेळले आणि ९ चौकार देखील ठोकले. तसेच सलामीवीर अंगकृष रघुवंशीने ४७ चेंडूंचा सामना करून ३५ धावा केल्या. राजा बावा भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ५५ चेंडूत ४३ धावांचे महत्वाचे योगदान दिले. तर, कौशल तांबेनेही ३५ धावांचे योगदान दिले आणि बावासोबत शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला.
गोलंदाजांमध्ये भारताच्या राजा बावा, विकी ओत्सवाल, कौशल तांबे आणि राजवर्धन हंगारगेकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर अफगाणिस्तानसाठी नूर अहमदने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नूरने टाकलेल्या १० षटकांमध्ये ४३ धावा खर्च केल्या आणि चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. नूरव्यतिरिक्त अफगाणिस्तानचा बिलाल सामी आणि खलिल अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
गुणतालिकेचा विचार केला, तर भारतीय संघ ग्रुप अ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने एशिया चषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव करणारा पाकिस्तान संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने खेळलेल्या तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने जिंकले आहेत. त्याव्यतिरिक्त ग्रुप अ मधील अफगाणिस्तान आणि यूएई संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले.
महत्वाच्या बातम्या –
तमिल थलाइवाजने हिसकावला यु मुंबाच्या विजयाचा घास; अखेरच्या रेडवर सामना ‘टाय’
बड्डेदिनी स्वत:लाच कोट्यवधींची कार भेट देत इमोशनल झाला ‘हा’ क्रिकेटर, सांगितले भावुक करणारे सत्य
दानवीर सूर्या! मैदान कर्मचाऱ्यांचे कौतुक करत केली ‘ही’ अमूल्य मदत
व्हिडिओ पाहा