भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीत मानहानीकारक पराभव पत्करावा होता. या पराभवानंतर भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने देखील दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात अनेक बदल करण्याचे सुचवले. गंभीरने दुसऱ्या कसोटीसाठी तब्बल पाच बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
पृथ्वी शॉमध्ये आत्मविश्वासाचा अभाव
एका प्रसारण वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने म्हटले, “भारताला दुसऱ्या कसोटीत अनेक बदल करणे गरजेचे आहे. मी मालिकेची सुरुवात पृथ्वी शॉसह केली असती. कारण, ४ कसोटीत दोन शतके झळकविणाऱ्या खेळाडूला पहिली संधी दिली जावी. मात्र, आता शॉमध्ये आत्मविश्वास आणि फॉर्मचा अभाव दिसत आहे.”
शुबमन गिलला द्यावी संधी
गंभीरने दुसऱ्या कसोटीसाठी मयंक अगरवालसोबत सलामीवीर म्हणून फॉर्ममध्ये असलेल्या शुबमन गिलला पसंती दिली. गंभीर म्हणाला, “मला वाटते दुसऱ्या कसोटीत मयंक अगरवालसोबत शुबमन गिलने सलामी द्यावी. गिल मालिकेआधीच्या सराव सामन्यांत चांगला खेळला होता. त्याला दुसऱ्या सामन्यात संधी देणे फायदेशीर ठरेल. चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी.”
भारताला करावे लागणार आहेत कमीत कमी दोन बदल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारत या सामन्यात दोन बदल करणार हे निश्चित आहे. कारण, भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे भारतात परतला आहे तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने मालिकेतून बाहेर पडला आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल. अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यासाठी भारतीय संघात सामील होईल.
गंभीरने सांगितलेला भारताचा संभाव्य संघ:
मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.
महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी स्टीव स्मिथचा भारतीय संघाला सल्ला; म्हणाला
– बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर असा सराव करा