संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट ग्राउंडवर सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या राहिलेल्या सामन्यांचा थरार सुरू आहे. १५ ऑक्टोबर रोजी दुबईच्या मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना पार पडेल. त्यानंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक २०२१ चे सामने होणार आहेत. त्यामुळे आयपीएलद्वारे खेळाडू आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी एकप्रकारे सराव करत आहेत.
याच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील आपल्या पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जचा सलामीवीर मयंक अगरवाल याने धमाकेदार फलंदाजी करत आपल्या टीकाकारांना आणि संघ निवडकर्त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. कारण युएईत फटकेबाजी करताना दिसणाऱ्या या मयंकला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळालेली नाही.
मयंकची ६७ धावांची चिवट झुंज
मंगळवारी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ३२ वा सामना झाला. या सामन्यात भलेही पंजाब संघाला २ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पण मयंकने केलेल्या खेळीच सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने युएई टप्प्यातील आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक ठोकत टी२० विश्वचषकासाठी त्याची दावेदारी सिद्ध केली आहे. त्याने राजस्थानविरुद्ध सलामीला फलंदाजीला येत ४३ चेंडूंमध्ये ६७ धावा फटकावल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ७ चौकार मारले होते.
निवडकर्त्यांकडून झाली चूक?
यावरुन स्पष्टपणे दिसून येते की, मयंक युएईच्या मैदानांवर टी२० विश्वचषकावेळी भारतीय संघासाठी ‘ट्रँप कार्ड’ सिद्ध झाला असता. पण निवडकर्ते आणि कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यामुळे त्याला १५ सदस्यीय संघात जागा मिळाली नाही. परंतु आता त्याचे प्रदर्शन पाहता, निवडकर्ते आणि कर्णधार कोहली यांनी त्याला संधी न देऊन मोठी चूक केली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मयंकच्या युएईत ४०० पेक्षा जास्त धावा
आयपीएल २०२० चा हंगामही कोरोनामुळे युएईतच खेळवला गेला होता. या हंगामात मयंकने ११ सामने खेळताना १५६ च्या स्ट्राईक रेटने ४२४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि २ अर्धशतके निघाली होती. दरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या १०६ धावा इतकी राहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या जल्लोषावर ‘विरजण’! पंजाबला धूळ चारल्यानंतर ‘या’ कारणामुळे संजूला १२ लाखांचा दंड
हारी हुई बाजी को जीतना हमें आता है! शेवटच्या २ षटकांत ‘असा’ झाला सामन्यात उलटफेर, सॅमसनचा खुलासा
राहुल होता नशिबाच्या रथावर स्वार, ३ वेळा मिळाले जीवनदान, राजस्थानला चूक सुधारणे गरजेचे; नाहीतर…