इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (२१ सप्टेंबर) या स्पर्धेतील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय मिळवला. या विजयासह आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत देखील मोठा उलटफेर झाला आहे. चला तर पाहूया कशी आहे गुणतालिकेची स्थिती.
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने ४९ धावांची खेळी केली होती. तर महिपाल लोमरोरने ४३ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर राजस्थान संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ तर कर्णधार केएल राहुलने ४९ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात पंजाब किंग्स संघाला विजय मिळवण्यासाठी ४ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना या धावा करता आल्या नाही. परिणामी राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.
या विजयासह राजस्थान संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत ५ व्या स्थानी पोहोचला आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. या दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाला ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पंजाब संघाची खराब कामगिरी दुसऱ्या टप्प्यातही सुरू आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या हा संघ ७ व्या स्थानी आहे. पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे; तर ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत अव्वल
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी आणि मुंबई इंडियन्स संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. साखळी फेरीअखेर गुणतालिकेतील सुरुवातीचे ४ संघ हे प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या जल्लोषावर ‘विरजण’! पंजाबला धूळ चारल्यानंतर ‘या’ कारणामुळे संजूला १२ लाखांचा दंड
“हा पराभव पचवणे खूप कठीण”, हातात असलेला सामना गमावल्यामुळे कर्णधार राहुल भावुक






