क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळात जर विजय मिळवायचा असेल, तर एकूण एक खेळाडूला आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागते. परंतु, एखादा खेळाडू असा असतो, जो अप्रतिम गोलंदाजी किंवा फलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. त्या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार दिला जातो.
पण जर असे सांगितले की संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे, तर अनेकांना त्याचे आश्चर्य वाटेल. परंतु, असे घडले आहे. एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल ३ वेळेस. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. परंतु, १४४ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ३ वेळेस ( १ कसोटी, २ वनडे) असा कारनामा घडला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड (१९९६)
वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ १९९६ मध्ये आमने-सामने आले होते. या कमी धावसंख्येच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज संघाला ४ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यानंतर पहिल्यांदाच सर्व ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करताना क्रेग स्पियरमनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला १५८ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघातील एकूण एक गोलंदाजाने गडी बाद केला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १५४ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात सर्व खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (१९९६)
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सप्टेंबर १९९६ रोजी रोमांचक सामना पाहायला मिळाला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने २४६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने २ चेंडू शिल्लक असतानाच सामना आपल्या नावावर केला होता. या सामन्यानंतर पाकिस्तान संघातील ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (१९९९)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल ३५१ धावांनी विजय मिळवला होता. त्याकाळी हा सर्वात मोठा विजय होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डावात अवघ्या १४४ धावा करता आल्या होत्या.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला ३९९ धावा करण्यात यश आले होते. दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात अवघ्या २१७ धावा करता आल्या. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या नावावर केला. यासह विजयी संघातील ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मालिकावीर पुरस्कार पटकावताच आर अश्विनची कॅलिसशी बरोबरी, आता नजर मुरलीधरनच्या विक्रमावर
श्रेयस अय्यरला बर्थडे गिफ्ट!! सामना झाल्यानंतर विराट कोहलीने ‘बड्डेबॉय’चा दिवस केला अविस्मरणीय
सिराजचा ‘जबरा फॅन’ बनला किवी दिग्गज; तुफानी गोलंदाजी पाहून म्हणतोय…