विक्रम… नावातच किती मोठेपण आहे नाही का. क्रिकेट जगतात खेळाडू आपल्या सर्वोत्तम कामगिरीने आधी केलेला विक्रम मोडून नवा विक्रम आपल्या नावावर करतो. तसं पाहिलं तर सर्वाधिक विक्रम हे फलंदाजांच्या नावावर असल्याचे दिसते. परंतु गोलंदाजही याबाबतीत मागे नसतात. फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर फलंदाज मैदानावर फलंदाजीस उतरल्यानंतर साहजिकच चाहते त्यांच्याकडून चौकार षटकारांची अपेक्षा करतात आणि फलंदाजही एकप्रकारे चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण करत चौकार षटकारांचा पाऊस पाडत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. त्याचबरोबर ते आपल्या नावावर विक्रमांची नोंदही करत असतात.
जर असे म्हटले, की कसोटीच्या एका डावात चौकार षटकारांच्या मदतीनेच सर्वाधिक धावा एखाद्या खेळाडूने केल्या आहेत, तर त्यावर फार कमी चाहत्यांना विश्वास बसेल. पण हो हे खरं आहे. ८ जुलैला तब्बल ५५ वर्षांपूर्वी एक विक्रम बनला होता.
इंग्लंडच्या डाव्या हाताचे सलामीवीर फलंदाज जॉन एडरिच (John Edrich) यांनी तेव्हा असा विक्रम केला होता, जो आजही अबाधित आहे. त्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात चौकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा करण्याचा अनोखा विक्रम केला होता. एडरिचने ८ ते १३ जुलै १९६५ यादरम्यान लीड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी डावात नाबाद ३१० धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. या डावात त्यांनी ५ षटकार आणि तब्बल ५२ चौकार ठोकले होते. त्यांनी आपल्या या त्रिशतकी खेळीत २३८ धावा या केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने ठोकल्या होत्या. म्हणजेच काय तर ७७ टक्के धावा चौकारांच्या मदतीने आल्या होत्या.
केवळ चौकारांबद्दल बोलायचं झालं, तर एका डावात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रमही जॉन एडरिच यांच्या नावावर आहे. एडचिच व्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला कसोटीच्या एका डावात ५० चौकार ठोकता आलेले नाहीत. एडरिच यांनी ५२ चौकार टोकले आहेत. १९६५ च्या लीड्स कसोटीत त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला होता. ब्रॅडमन यांंनी १९३० साली याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध ३३४ धावांची खेळी केली होती, त्यामध्ये ४६ चौकारांचा समावेश होता.
मजेशीर गोष्ट अशी की भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) २००६ मध्ये एडरिच यांचा विक्रम मोडण्यापासून चुकला होता. त्याने लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध २५४ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात तब्बल ४७ चौकारांचा (१ षटकारही होता) समावेश होता. म्हणजेच तो एडरिच यांची बरोबर करण्यापासून केवळ ५ चौकार दूर होता.
८३ वर्षीय एडरिच यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण ७७ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहेत. त्यात त्यांनी ४३.५४ च्या सरासरीने ५१३८ धावा केल्या आहेत. कसोटीत त्यांनी १२ शतके आणि २४ अर्धशतकेही ठोकली आहेत. याव्यतिरिक्त मायदेशात त्यांनी एकूण ५६४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ४५.४७ च्या सरासरीने ३९७९० धावा केल्या आहेत. त्यामध्ये १०३ शतके आणि १८८ अर्धशतकांचा समावेश आहे.
कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
१. जॉन एडरिच (इंग्लंड)- ५२ चौकार आणि ५ षटकार (३१०*), विरुद्ध न्यूझीलंड (लीड्स, १९६५)
२. विरेंद्र सेहवाग (भारत)- ४७ चौकार आणि १ षटकार (२५४), विरुद्ध पाकिस्तान (लाहोर, २००६)
३. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)- ४६ चौकार (३३४), विरुद्ध न्यूझीलंड (लीड्स, १९३०)
४. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)- ४५चौकार (३७५), विरुद्ध इंग्लंड (सेंट जॉन्स, १९९४)
५. व्हीव्हीएस लक्ष्मण (भारत)- ४४ चौकार (२८१), विरुद्ध ऑस्ट्रेलिया (कोलकाता, २००१)
वाचनीय लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
-असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
-एकेवेळी होते टी२० संघाचे देशाचे कर्णधार, आज कोणाला आठवतही नाही त्यांचे नाव