---Advertisement---

पहिल्या फाइव्ह विकेट हॉलनंतर ‘असे’ केले भारतीय खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे स्वागत, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 3:21 PM
---Advertisement---

ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात ३२८ धावांचे आव्हान मिळाले. दरम्यान युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ‘फाइव्ह विकेट हॉल’ म्हणजेच एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यानंतर भारतीय संघाच्या इतर खेळाडूंनी आणि स्टाफने त्याचे जल्लोषात स्वागत केले.

वेगवान गोलंदाज सिराज याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात १९.५ षटके गोलंदाजी करत ७३ धावांवर सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मार्नस लॅब्यूशाने ही त्याची दुसऱ्या डावातील पहिली विकेट ठरला. रोहित शर्माच्या हातून २५ धावांवर त्याने लॅब्यूशानेला बाद केले. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुड यांना त्याने बाद केले. अशाप्रकारे एका डावात ५ विकेट्स घेण्याची (फाइव्ह विकेट हॉल) खास कामगिरी त्याने केली.

पुढे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू पव्हेलियनला जात होते. यावेळचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत संघाबाहेर असलेले भारतीय खेळाडू आणि सहयोगी कर्मचारी मैदानाबाहेर उभे राहून सिराजला त्याच्या कामगिरीसाठी स्टँडिंग ओवेशन देताना दिसत आहेत. तसेच त्यांनी जोरजोराने टाळ्या वाजवत सिराजचे कौतुक केले आहे. पुढे जसप्रीत बुमराह सिराजची गळाभेट घेत त्याची पाठ थोपटताना दिसत आहे.

बीसीसीआयने शेअर केलेला हा सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. बीसीसीआयसह चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनीही सिराजवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

भारतीय दिग्गजांकडून कौतुकाची थाप

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी ट्विटरद्वारे सिराजचे कौतुक केले आहे. ‘वडीलांना गमावले, तरीही ऑस्ट्रेलियामध्ये थांबण्याची हिम्मत दाखवली. वर्षद्वेषी टीका झाली, त्याचा तिळभरही प्रभाव स्वत:वर पडू दिला नाही. पुढे कारकिर्दीतील केवळ तिसऱ्या कसोटी सामन्यात फाइव्ह विकेट्स हॉल घेण्याचा पराक्रम केला,’ या शब्दात त्यांनी सिराजची प्रशंसा केली आहे.

एवढेच नव्हे तर, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही सिराजची पाठ थोपटली आहे. ‘खूप अप्रतिम गोलंदाजी केलीस मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलिया दौरा जस-जसा पुढे जात आहे, तस-तशी तुझ्यात प्रगती होत आहे. हे पाहून खूप आनंद झाला. पुढील कारकिर्दीसाठी तुला खूप शुभेच्छा,’ असे भोगले यांनी म्हटले आहे.

कसोटी मालिकेतील मोहम्मद सिराजची कामगिरी

२६ वर्षीय सिराजने मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यापुढील सिडनी कसोटी सामन्यात त्याने २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले होते. याबरोबर ब्रिस्बेनमध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १ विकेट आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत कसोटी मालिकेत एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test : पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, दिवसाखेर भारताच्या बिनबाद ४ धावा; अद्याप ३२४ धावांची गरज

कांगारूंच्या देशात भारतीयांचा वचक! ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

सलग तीन दिवस पाऊस पडूनही ‘त्या’ कसोटी सामन्याचा लागला होता निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---