भारत विरुद्ध इंग्लंडची बहुप्रतिक्षित चार सामन्यांची कसोटी मालिका आज निकाली ठरली. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा एक डाव आणि २५ धावांनी पाडाव केला. यासह मालिकेवर ३-१ अशा फरकाने आपले नाव कोरले. या विजयाने भारताला अनेक आघाड्यांवर फायदा झाला.
इंग्लंडविरुद्धच्या या विजयाने भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तसेच आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकून अव्वल स्थान देखील गाठले आहे. मात्र भारताचा विजय आणि या सगळ्या खुशखबरींचा एक अनोखा मेळ साधला गेला आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने ट्विट करत हा योगायोगांचा मिलाफ लक्षात आणून दिला.
जाफरने केले ट्विट
वसीम जाफरने भारताच्या विजयानंतर संघाचे अभिनंदन करणारे ट्विट केले. यात त्याने आजच्या विजयासह झालेले चार योगायोग लक्षात आणून दिले. आजच्याच दिवशी बरोब्बर ५० वर्षांपूर्वी भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पदार्पण केले होते. यानिमित्ताने बीसीसीआयने आज त्यांचा सत्कार देखील केला.
भारतीय क्रिकेटमधील याच सुवर्णदिवशी भारताने इंग्लंडवर देखील मालिका विजय प्राप्त केला. तसेच या विजयासह जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या अंतिम सामन्यात भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करेल. मात्र इतकेच नव्हे, तर या विजयाने भारतीय संघाने बऱ्याच कालावधीनंतर जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडला पछाडत अव्वल स्थानही गाठले. त्यामुळे अशा प्रकारे आजचा दिवस भारतासाठी ‘चौपट’ आनंद देणारा ठरला. वसीम जाफरने आपल्या ट्विटमध्येही हीच गोष्ट लक्षात आणून दिली.
50 years since Sunny Sir's debut👏
India wins the series Vs England👏
India qualifies for ICC WTC final👏
India becomes No.1 Test Team👏Congratulations to Team India and its fans all around the world! @BCCI #INDvsENG pic.twitter.com/4oxjk5YHbZ
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 6, 2021
दरम्यान, चौथ्या सामन्यात भारताला विजय मिळवण्यात कसलीही अडचण आली नाही. इंग्लंडचा संघ याही सामन्यात फारसा प्रतिकार करू शकला नाही. त्यामुळे भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवत मालिका ३-१ अशी खिशात घातली. तुफानी शतकी खेळी साकारणाऱ्या रिषभ पंतला सामनावीराचा तर संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आर अश्विनला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
विराट अँड कंपनीची भरारी! इंग्लंडवरील विजयाने जागतिक क्रमवारीत गाठले अव्वल स्थान
भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरताच विराटचा कपिल, गांगुली धोनीच्या पंक्तीत समावेश
भावा हे काय केलंस! विराटचा थ्रो लागला रूटच्या नाजुक भागी, मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल