गेल्या काही दिवसांपासून डीआरएसच्या निर्णयांवरुन क्रिकेट जगतात घमासान चालू आहे. अशातच इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी (२६ मार्च) पुणे येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही डीआरएसच्या अनाकलनीय तरतूदीमुळे भारताला ४ धावांचा तोटा झाला. आता या निर्णयावरुन चांगलाच वाद पेटला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी या वादात उडी घेत पंचांवर निशाणा साधला आहे.
काय होते प्रकरण?
झाले असे की, पहिल्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असतांना ४०व्या षटकांत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करन गोलंदाजी करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिषभ पंतने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सीमापार पण गेला होता. मात्र इंग्लंडच्या खेळाडूंना हा चेंडू पंतच्या पॅडला लागला, असे वाटल्याने एलबीडब्ल्यूचे अपील केले. यावर पंचांनी पंतला बाद घोषित केले.
मात्र यावर पंतने लगेचच रिव्ह्यू अर्थात डीआरएस घेतला. त्यावेळी पाहिल्या गेलेल्या रिप्लेमध्ये चेंडू पंतच्या बॅटला लागले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय मागे घेत रिषभ पंत नाबाद असल्याचे सांगितले. मात्र मैदानावरील पंचांनी त्याआधीच त्याला बाद दिले असल्याने नियमानुसार तो डेड बॉल ठरला होता. त्यामुळे चेंडू सीमारेषेपार जाऊन देखील भारताला एकही धाव मिळाली नाही.
आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला संताप
या मुद्द्यावरुन प्रसिद्ध समालोचक चोप्रा यांनी पंचांवर टिका केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘रिषभ पंतला पंचांच्या चुकीमुळे ४ धावा गमवाव्या लागल्या. हाच निर्णय १०१०१०३६४ वेळा रिपीट करून पाहा. जर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या चेंडूवर घडले असते आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयासाठी २ धावांची गरज असती, तर काय झाले असते. विचार करा, विचार करा.’
So, Pant lost on 4 runs because of a glaring umpiring error. Repeating this for 101010364th time—what if this happened on the final ball of the World Cup final with the batting team needing 2 to win??? Socho Socho…. #IndvEng
— Aakash Chopra (@cricketaakash) March 26, 2021
काय सांगतो नियम?
डीआरएसच्या एका नियमामुळे भारताला या चार धावा नाकारण्यात आल्या. या नियमानुसार जर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद दिले असेल, तर तो चेंडू निर्धाव समजला जातो. त्या चेंडूवर काढलेल्या धावा ग्राह्य धरल्या जात नाहीत. मात्र तो चेंडू ग्राह्य धरला जातो. त्यामुळे पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे बाद दिल्यावर फलंदाज डीआरएसच्या मदतीने आपली विकेट वाचवू शकतो, मात्र धावांच्या बाबतीत त्याला उपाशीच राहावे लागते.
महत्त्वाच्या बातम्या-
बॅटिंग मास्टर टू कॅच मास्टरची तयारी! आयपीएलपुर्वी इशान करतोय क्षेत्ररक्षणाचा कसून सराव, पाहा फोटो
वर्ल्डकप सुपर लीग: दुसरी वनडे जिंकत इंग्लंड अव्वलस्थानी विराजमान, भारत टॉप-५ च्याही खाली






