आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. संघांनी बर्याच खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतर नुकत्याच स्पर्धेच्या तारखांची घोषणा झाली. आता, १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे खेळाडूंचा लिलाव पार पडेल. तत्पूर्वी, समालोचक आकाश चोप्राने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघांमध्ये कमी असल्याचे म्हटले. संघ व्यवस्थापन आगामी लिलावात ही कमी भरून काढेल अशी अपेक्षा त्याला आहे.
मुंबई संघात आहे ही कमतरता
भारताकडून १० कसोटी सामने खेळलेला माजी सलामीवीर आकाश चोप्रा सध्या समालोचक म्हणून काम पाहतो. तसेच, आपल्या युट्यूब खात्यावरून तो सातत्याने क्रिकेट संबंधित अनेक विषयांवर चर्चा करताना दिसतो. नुकत्याच एका भागामध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघाविषयी आपली मते मांडली. यावेळी त्याने मुंबई संघात कमतरता असल्याचे म्हटले.
तो म्हणाला, “माझ्या मते मुंबई संघात दोन वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. पुढील हंगामात मुंबईचे गोलंदाजी आक्रमण बऱ्यापैकी नवीन असेल. मलिंगा निवृत्त झाला आहे तर पॅटीन्सन, मॅकलनघन व नॅथन कुल्टर-नाईल यांना करारमुक्त करण्यात आले आहे. मुंबईला ट्रेंट बोल्टसाठी पर्याय शोधावा लागेल.”
आकाश चोप्रा उपलब्ध असलेला पर्यायांविषयी बोलताना म्हणाला, “मुंबईसाठी सर्वोत्तम पर्याय मिचेल स्टार्कच्या रुपात उपलब्ध आहे. मात्र, कदाचित ते त्याच्यावर बोली लावणार नाहीत. माझ्या मते ते कुल्टर-नाईलला कमी किमतीत पुन्हा आपल्या संघात सामील करून घेऊ शकतात. याशिवाय, न्यूझीलंडचा कायले जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा जे रिचर्डसन हे चांगले पर्याय ठरू शकतात. लिलावात मुंबई या खेळाडूंसाठी बोली लावेल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”
मुंबई संघाचे गोलंदाजी आक्रमण आहे अनुभवी
सध्या मुंबई संघाचे गोलंदाज आक्रमण अनुभवी भासत आहे. भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व न्यूझीलंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करतात. सोबतच फिरकीपटू म्हणून कृणाल पंड्या आणि राहुल चहर हे पर्याय मुंबईकडे उपलब्ध आहेत. अनुभवी धवल कुलकर्णी हादेखील मुंबई संघाचा भाग आहे.
महत्वाच्या बातम्या:
कोहलीच्या कसोटी आणि वनडेतील नेतृत्वावर मला कधीच आक्षेप नव्हता, भारताच्या माजी सलामीवीराचे वक्तव्य
धोनीने संधी न दिलेल्या खेळाडूने गाजवली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी