fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद

-आदित्य गुंड 
वेंकटेश प्रसादचं नाव घेतलं की ९० च्या दशकातल्या आम्हा पोरांना १९९६ च्या वर्ल्ड कपची पाकिस्तानविरुद्धची मॅच आठवते. आधीच वर्ल्ड कप, त्यात भारत पाकिस्तान म्हणजे अख्खा देश टीव्हीसमोर असायचा. हा सामनाही त्याला अपवाद नव्हता. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत २८७ धावा केल्या.
या विश्वचषकात श्रीलंकेच्या जयसूर्या कालूवितरणा जोडीने धावा काढायचा एक नवा पायंडा पाडला. पहिल्या पंधरा षटकांत ते इतक्या वेगाने धावा काढायचे की त्यातून प्रतिस्पर्धी संघ सावरेपर्यंत लंकेच्या निम्म्या धावा झालेल्या असत. पहिल्या १५ षटकांत क्षेत्ररक्षणावर मर्यादा असताना हे दोघे निम्मा सामना संपवून टाकत. भारताच्या २८७ धावांना उत्तर देताना पाकिस्तानच्या सईद अन्वर आणि आमिर सोहेल या जोडगोळीने श्रीलंकेचा फंडा वापरायला सुरुवात केली. या दोघांनी १० षटकांत ८४ धावा कुटल्या.
सोहेल-अन्वर हे दोघेच पाकिस्तानला सामना जिंकून देतात की काय असे वाटत असतानाच श्रीनाथने अन्वरला बाद केले. मात्र त्याचा सोहेलवर अजिबात परिणाम झाला नाही. त्याने आपला तडाखा सुरूच ठेवला. पाकिस्तानच्या डावातले १४ वे षटक मात्र या सामन्याला कलाटणी देणारे ठरले. वेंकटेश प्रसादने टाकलेल्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सोहेलने क्रीजमधून बाहेर सरसावत कव्हर्समधून चौकार मारला. इतक्यावरच न थांबता त्याने प्रसादला डिवचले. आपल्या रनअपकडे परत चाललेल्या प्रसादकडे, “पुढच्या चेंडूला देखील तुला चौकार मारतो” अशा आशयाचे काहीतरी हावभाव त्याने केले.
प्रसादही इरेला पेटला. आता कोहलीच्या नेतृत्वाखाली अरे ला का रे? ने उत्तर देणारे खेळाडू तेव्हा भारताकडे नव्हते. प्रसाद तर आजही खेळत असता तरी त्याने कधी कोणाला स्लेजिंग केले नसते. मात्र याचा अर्थ तो सगळेच ऐकून घेणारा होता असेही नाही. पुढच्याच चेंडूवर त्याने सोहेलचा त्रिफाळा उडवत त्याला योग्य ते प्रत्त्युत्तर दिले. कांबळीने सोहेलला निरोप देताना ‘भ’ ची बाराखडी वापरली असे आजही आठवते. सोहेलची विकेट गेली तेव्हा आमच्या घरातही जोरदार आरडाओरडा झाला. आता भारत नक्की जिंकणार असा विश्वास संघाला आणि चाहत्यांना वाटू लागला.
अजूनही पाकिस्तानकडे इजाज अहमद, इंझमाम, जावेद मियाँदाद यांच्यासारखे कसलेले फलंदाज होते. भारताच्या तोंडातून घास काढून घेण्याची क्षमता या तिघांकडे निश्चितच होती. प्रसादने टाकलेल्या पुढच्याच ओव्हरला इंझमाम झेलबाद होता होता राहिला. मोंगियाने हा झेल सोडला तेव्हा प्रसादने त्याच्याकडे इतक्या रागाने पहिले की मोंगिया त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघूच शकला नाही. त्यादिवशी प्रसाद काहीतरी वेगळे खाऊन आला असावा. त्यानंतरच्या ओव्हरला त्याने इजाज अहमदला झेलबाद केले. पुढच्या ओव्हरला आधी केलेली चूक भरून काढत मोंगियाने त्याच्याकडे आलेला इंझमामचा झेल पकडत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले.
उरलेले काम कुंबळेने केले आणि धोकादायक अशा सलीम मलिकला बाद केले. दडपण वाढलेल्या पाकिस्तानच्या मग विकेट पडत गेल्या. आधीच स्लो ओव्हर रेटमुळे त्यांना ४९ ओव्हर्समध्येच २८८ करायच्या होत्या. त्यांना काही ते जमले नाही आणि भारताने सामना जिंकला. पुढे सेमी फायनलला भारताचा श्रीलंकेने दारुण पराभव करत भारताचे विश्वचषकातले आव्हान संपवले.
या सामन्यात खरं तर सिद्धू मॅन ऑफ द मॅच होता. मात्र प्रसादने आमिर सोहेलची विकेट ज्या परिस्थितीत काढली त्यामुळे पुढची अनेक वर्षे ही मॅच म्हणजे वेंकटेश प्रसाद असेच समीकरण राहिले. आपला लाइमलाईट चोरून घेतल्यामुळे सिद्धू कदाचित प्रसादला शिव्याही घालत असेल पण भारत जिंकला त्यामुळे खूषदेखील होत असेल.
विकेट मिळाल्यानंतर प्रसाद उजवा हात वर करत आऊटचा इशारा करत धावत जायचा. विकेटचे सेलिब्रेशन करायची त्याची ही स्टाईल तेव्हा युनिक होती. हे सेलिब्रेशन करतानाचा फोटो असलेलं एक पोस्टर मला त्यावेळी दादांनी आणलं होतं. प्रसाद काही वर्षे कॅनरा बँकेत होता. आजही कॅनरा बँकेच्या अनेक योजनांच्या पोस्टर्सवर त्याचा फोटो असतो. विशेषतः १९९६ च्या वर्ल्डकप नंतर बँकेने त्याची लोकप्रियता आपल्या प्रसिद्धीसाठी चांगली वापरून घेतली होती.
काल प्रसादचा वाढदिवस होता. एरवी भारतीय खेळाडूंना अतिशय सुमार पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बीसीसीआयने काल मात्र अपवाद केला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात प्रसादने आमिर सोहेलची विकेट काढलेली व्हिडीओ क्लिप ट्विटरवर टाकून त्यांनी या गोलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

You might also like