---Advertisement---

‘नेट गोलंदाज म्हणून निवड होणे ही प्रगती नाही तर अधोगती’, आवेश खानच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 6:42 PM
avesh-khan
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफ पर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलेला वेगवान गोलंदाज आवेश खानने आपल्या गोलंदाजीने अनेक दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे. टी२० विश्वचषक २०२१ साठी नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघामध्येही आवेशची निवड झाली आहे. पण आवेशचे वडील आशिक खान आणि त्यांचे कुटुंबीय या गोष्टीवर फारसे खूश नाहीत. आवेशचे वडील त्याच्या या निवडीला प्रगती नाही तर अधोगती मानतात.

आवेश हा मूळचा मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील आहे. त्याचे वडील आशिक खान यांचे पानांचे दुकान आहे. त्यांना आपला मुलगा आवेशला कसोटी सामना खेळताना बघायचा आहे. आवेशला आतापर्यंत भारतीय संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळू शकलेली नाही. त्याने आयपीएलमध्ये २५ सामने खेळले आहेत त्यात त्याने २९ विकेट्स घेतल्या आहेत.

जेव्हा आवेशच्या वडिलांना इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, २०२१ च्या टी२० विश्वचषकात नेट गोलंदाज म्हणून आवेशची निवड झाल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का? तेव्हा ते म्हणाले, ‘त्यात आनंदी होण्यासारखे काय आहे? नेट गोलंदाज म्हणून तो गेली ३-४ वर्षांपासून संघासोबत आहे. काहीतरी नवीन घडले की आनंद होतो. ही काही नवीन गोष्ट नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याची स्टँडबाय म्हणून निवड झाली होती. अशा परिस्थितीत नेट गोलंदाज म्हणून पुन्हा निवडले जाणे, हे पदोन्नती नसून, एक प्रकारची अधोगती आहे. त्याची मुख्य संघात निवड होणे अपेक्षित होते. किमान त्याला स्टँडबायमध्ये जागा मिळायला हवी होती.’

आवेशने आयपीएलच्या या हंगामात एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली अशा दिग्गज फलंदाजांना बाद केले, त्याच्या या यशाबद्दल तुम्ही काय म्हणाल? या प्रश्नावर आवेशचे वडील म्हणाले, ‘आनंद आहे, पण त्याने आतापर्यंत जितक्या विकेट्स घेतल्या आहेत, हे सर्व अव्वल फलंदाज आहेत. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांच्या फार कमी विकेट्स घेतल्या आहेत. याआधी आयपीएलमध्ये त्याला इतक्या संधी मिळाल्या नव्हत्या, पण यावेळी त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले आहे.’

‘खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आयपीएल हे एक चांगले व्यासपीठ आहे. मला आशा आहे की त्याची कसोटी क्रिकेटसाठी निवड होईल. मला आवेशला कसोटी क्रिकेट खेळताना पाहायचे आहे.’

अवेश २०१७ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. पण त्याला यापूर्वी फारशा संधी मिळाल्या नव्हत्या. पण यंदाच्या हंगामात त्याला १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. या हंगामात त्याने १६ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं तर! भारत – इंग्लंड पाचव्या कसोटीला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, इंग्लंड बोर्डाची घोषणा

‘रनमशीन’ विराट कोहलीपेक्षा ‘या’बाबतीत बाबर आजम खूपच दूर, पाहा ही खास आकडेवारी

भन्नाट कॅच! पीएनजीच्या चार्ल्स अमिनीने घेतला अविश्वसनीय झेल, फलंदाजी करणारा शाकीबही झाला थक्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---