---Advertisement---

ठरलं तर! भारत – इंग्लंड पाचव्या कसोटीला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, इंग्लंड बोर्डाची घोषणा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 5:52 PM
---Advertisement---

भारतीय संघ यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार होती. पण, मालिकेतील ४ सामने पूर्ण झाल्यानंतर कोरोनाच्या कारणाने ५ वा कसोटी सामना स्थगित करावा लागला होता. आता हा सामना जुलै २०२२ मध्ये होणार असल्याची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आली आहे.

हा कसोटी सामना आता १ जुलै २०२२ पासून एजबस्टन येथे पार पडणार आहे. पाचवा कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील करारानुसार घेण्यात आला आहे.

यापूर्वी पाचवा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान मँचेस्टर येथे होणार होता. पण, त्यापूर्वीच भारतीय ताफ्यात काही कोरोनाची प्रकरणे आढळली. त्यामुळे भारतीय संघाने पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. त्याच कारणाने हा सामना स्थगित करण्यात आला होता. हा सामना स्थगित करण्यात येण्यापूर्वी भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४ सामन्यांनंतर २-१ अशा फरकाने आघाडीवर होते.

दरम्यान, पुढीलवर्षी भारतीय संघ जुलैमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणारच होता. त्यामुळे आता याचदरम्यान हा उर्वरित कसोटी सामनाही पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कसोटी सामन्यामुळे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील वनडे आणि टी२० मालिकाही पुढे ढकलण्यात आली आहे.

याआधी १ जुलैपासून टी२० आणि वनडे मालिकांना सुरुवात होणार होती. पण आता ७ जुलै पासून ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल, या मालिकेतील सामने अनुक्रमे ७, ९ आणि १० जुलै रोजी एजेस बॉल, एजबस्टन आणि ट्रेंट ब्रिज येथे होतील. त्यानंतर १२ जुलैपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. १२, १४ आणि १७ जुलै रोजी वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे द ओव्हल, लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे होतील.

याबरोबरच या मालिकांचे वेळापत्रक बदलावे लागल्याने दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळापत्रकातही बदल केला जाऊ शकतो. कारण, दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यांना १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचेही या बदलांना समजून घेतल्याबद्दल आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं तर! भारत-इंग्लंड संघातील पाचव्या कसोटीला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, इंग्लंड बोर्डाने केली घोषणा

‘रनमशीन’ विराट कोहलीपेक्षा ‘या’बाबतीत बाबर आजम खूपच दूर, पाहा ही खास आकडेवारी

भन्नाट कॅच! पीएनजीच्या चार्ल्स अमिनीने घेतला अविश्वसनीय झेल, फलंदाजी करणारा शाकीबही झाला थक्क

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---