यंदाच्या आयपीएल हंगामात नेहमीप्रमाणेच युवा आणि नवख्या खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले आहे. अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरत असतांना युवा खेळाडूंनी आपल्या संघांची कमान सांभाळली आहे. अशाच प्रभावित केलेल्या खेळाडूंमधील दोन नावे म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज आवेश खान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळणारा फलंदाज रजत पट्टीदार. या दोनही युवा खेळाडूंनी यंदाच्या हंगामात आपापल्या संघांसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
मात्र नुकत्याच या दोघांचे प्रशिक्षक असलेल्या अमय खुरासिया यांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. एकेकाळी या दोन प्रतिभावान खेळाडूंना राज्याच्या संघात स्थान देण्यावरून अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र कठीण काळात या खेळाडूंना पाठिंबा दिल्याने आज ते पुढे आल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
मध्य प्रदेशच्या संघात स्थान मिळविण्यासाठी होता संघर्ष
आवेश खान आणि रजत पट्टीदार हे दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. या दोघांनीही भारताचे माजी खेळाडू असलेल्या आणि नंतर प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमय खुरासिया यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. मात्र या दोघांनाही मध्य प्रदेशच्या रणजी संघात स्थान मिळवताना संघर्ष करावा लागला होता. या घटनाक्रमाचा खुलासा खुद्द खुरासिया यांनीच केला आहे.
ते म्हणाले, “आवेश आणि रजत या दोघांनीही ज्या ज्या वेळी जे सांगितले, ते ते अंमलात आणले. दोघेही अतिशय शिस्तबद्ध आहेत. याचमुळे ते प्रगती करत आहेत. मला आठवते आहे जेव्हा २००८ साली मध्य प्रदेशच्या रणजी संघासाठी निवड प्रक्रिया झाली होती त्यावेळी १४ वर्षीय आवेश खानला देखील संघात स्थान मिळाले होते. त्याच्या प्रतिभेने सगळेच प्रभावित झाले होते. मात्र संघात स्थान देण्यासाठी कोणी राजी नव्हते. त्यावेळी आवेशला संघात स्थान देण्यासाठी मी आग्रह धरला होता. त्यावरून मला टीकेला देखील सामोरे जावे लागले होते. रजतच्या बाबतीत देखील काहीसा असाच प्रकार घडला होता. मात्र त्याच्या खराब काळात मी त्याला पाठिंबा दिला. मात्र यासाठी देखील माझ्यावर टीका करण्यात आली होती.”
मात्र आता हे दोन्ही खेळाडू आयपीएल मध्ये शानदार प्रदर्शन करत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात हे दोघे भारतीय संघाकडून खेळतांना दिसतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि सरकारचे आभार मानतो, की त्यांनी या खेळाडूंना पाठिंबा दिला. तसेच मलाही त्यांना घडवण्यात मदत केली. आगामी काळात आमच्या अॅकॅडमीतून असेच प्रतिभावान खेळाडू जगासमोर येतील, असा माझा विश्वास आहे”, असे खुरासिया शेवटी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मुंबईच्या शिलेदारांना जहीरने दिला विजयाचा मंत्र, पाहा व्हिडिओ
मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर हैदराबादच्या कर्णधारपदावरुन पायउतार, विलियम्सन नवा कर्णधार