क्रिकेटमधील सध्याचा सर्वात लोकप्रिय खेळाडूंबद्दल चर्चा करायची झाल्यास एबी डिविलियर्स याचे नाव आल्याशिवाय राहणार नाही. डिविलियर्सने त्याच्या चौफेर फटकेबाजीने गेल्या अनेक वर्षांत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याचे लाखो चाहते जगभरात आहे. भारतातही त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते असून भारतीयांचे सर्वाधिक प्रेम लाभलेला परदेशी क्रिकेटपटू म्हणून त्याला ओळखले जाते. पण कोणी जर असं सांगितलं की डिविलियर्सने एकदा भारताविरुद्धच्या सामन्यात खेळताना चिटिंग केली होती, तर कोणालाही पटकन विश्वास बसणार नाही. पण अशी एक घटना २००७ साली घडली होती, ज्यामुळे डिविलियर्सच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
ही घटना २००७ साली आर्यंलडमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात झालेल्या ३ सामन्यांच्या फ्यूचर कप या वनडे मालिकेत घडली होती. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने आणि दुसरा सामना भारताने जिंकला असल्याने मालिकेत १-१ अशी बरोबरी झालेली होती. या मालिकेतील तिसरा सामना १ जुलै २००७ रोजी झाला. हा मालिकेतील निर्णायक सामना होता.
या सामन्यात कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेला डिविलियर्स मॉर्न वॅन विकसह सलामीला फलंदाजीला उतरला. पण मॉर्न वॅन विक खास काही करु शकला नाही तो शुन्यावर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ जॅक कॅलिसही भोपळ न फोडता माघारी परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था २ बाद ८ धावा अशी झाली.
त्यानंतर ५ वे षटक टाकण्यासाठी भारताकडून झहीर खान आला. त्याने टाकलेला पहिलाच चेंडू डिविलियर्सला समजला नाही आणि चेंडू बॅटच्या बाहेरची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या सचिन तेंडुलकरच्या हातात गेला. त्यावेळी झहीरसह भारतीय खेळाडू आनंद व्यक्त करायला लागले. पण डिविलियर्स जागेवरचा हलला नाही. तसेच त्या सामन्यात पंचगिरी करणारे अलीम दार यांनीही डिविलियर्सला नाबाद दिले.
त्यावेळी डिआरएस नसल्याने भारतीय संघाला पंचाचा निर्णयच अंतिम मानावा लागणार होता. नंतर दाखवण्यात आलेल्या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की चेंडू बॅटची कड घेऊन सचिनकडे गेला आहे. तसेच ज्यावेळी डिविलियर्सला पंचांकडून नाबाद देण्यात आले, तेव्हा भारतीय खेळाडू आश्चर्यचकीत झाल्याचे दिसले. सचिनसह, सौरव गांगुली, एमएस धोनी, झहीर खान यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसले होते.
पण, डिविलियर्सला मिळालेले हे जीवदान भारताला फारसे महागात पडले नाही. तो १३ व्या षटकात गांगुलीविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक एमएस धोनीकडे झेल देऊन ३५ चेंडूत १५ धावा करत बाद झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ३१ षटकांचा झाला होता. दक्षिण आफ्रिकेने ३१ षटकांत १४८ धावा केल्या होत्या. तर भारताने ३०.२ षटकात १५२ धावा करत हा सामना जिंकत मालिका जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
मित्रप्रेम की योगायोग? १७ फेब्रुवारी डिविलियर्स आणि डू प्लेसिससाठी खास दिवस
आयपीएल २०२२ मध्ये अशा असू शकतात सर्व १० फ्रँचायझींच्या सलामी जोड्या, पाहा संपूर्ण यादी