मंगळवारी (२७ एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर एबी डिविलियर्सने वादळी खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या अतीतटीच्या सामन्यात बेंगलोर संघाने १ धावाने विजय मिळवला होता. या सामन्यात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या एबी डिविलियर्सला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. परंतु डिविलियर्सने या विजयाचे श्रेय स्वतः न घेता संघातील दुसऱ्या खेळाडूंना दिले.
दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून बेंगलोर संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. बेंगलोर संघातील मुख्य फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर डिविलियर्सने युवा रजत पाटीदारसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली होती. त्याने अवघ्या ४२ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर बेंगलोर संघाने १७१ धावांचा डोंगर उभारला होता. तसेच या धावांचा पाठलाग करताना रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायरने झुंज दिली होती. परंतु त्यांना सामना जिंकवून देण्यात अपयश आले होते.
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर डिविलीयर्सने म्हटले की, “मी आता सामने खेळत नसलो तरीही मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेत असतो. हेच मुख्य कारण आहे की, मी चांगली कामगिरी करू शकत आहे. भारतीय संघातून या हंगामात उत्कृष्ट गोलंदाज आले आहेत. मोहम्मद सिराज त्यांच्यापैकीच एक आहे. त्याने आज चांगली गोलंदाजी केली. तसेच आमच्याकडे विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल देखील आहेत.”
केला हा मोठा विक्रम
एबी डिविलियर्सच्या तुफान फटकेबाजीमुळे बेंगलोर संघाने शेवटच्या ७ षटकात ७७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने मार्कस स्टॉइनिसने टाकलेल्या २० व्या षटकात २३ धावा कुटल्या होत्या. यासोबतच त्याने सर्वात कमी चेंडू खेळत ५००० धावांचा पल्ला गाठला आहे. ७५ धावा करताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरनंतर आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तो दुसराच परदेशी क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ निर्णय घेत रिषभ बचावला अन् कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला, बघा नक्की काय किस्सा घडला
बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा
हेटमायरची ५३ धावांची झुंज व्यर्थ, पराभवानंतर त्याची रिऍक्शन पाहून तुमच्याही डोळ्यात तरळतील अश्रू