आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकदिवसीय स्वरूपाची सुरुवात 5 जानेवारी 1971 रोजी झाली. तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये अनेक महान फलंदाज झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पाच सर्वोत्तम फलंदाजांबद्दल चर्चा सुरू आहे. आता जागतिक क्रिकेटमध्ये मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने 5 महान एकदिवसीय फलंदाजांची नावे जाहीर केली आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील 5 महान फलंदाजांची नावे जाहीर केली. यामध्ये त्याने 3 भारतीय, एका ऑस्ट्रेलियन आणि एका दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची नावे समाविष्ट केली. त्याच्या यादीत त्याने पहिले नाव घेतले ते ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचे. यानंतर, डिव्हिलियर्सने भारतीय क्रिकेटमधील ३ सुपरस्टार खेळाडूंची नावे सांगितली. यामध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. शेवटी त्याने दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचे नाव घेतले.
एबी डिव्हिलियर्सचे एकदिवसीय इतिहासातील 5 महान फलंदाज
- रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)
- सचिन तेंडुलकर (भारत)
- विराट कोहली (भारत)
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
- एमएस धोनी (भारत)
या खेळाडूंच्या एकदिवसीय आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, सचिन तेंडुलकरने या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे. विराटने एकदिवसीय सामन्यात 14181 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने एकदिवसीय सामन्यात 13704 धावा केल्या. या विक्रम यादीत पॉटिंग चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या एकदिवसीय सामन्यात 11579 धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये एमएस धोनीने 10773 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 15 फलंदाजांनी 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय सामन्यात 9577 धावा केल्या आहेत.