इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिलाच सामना पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना येत्या २४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या सामन्याची दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.दरम्यान या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय संघाची खोड काढली आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक यांचे म्हणणे आहे की, भारतीय संघ पाकिस्तान संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाही. कारण, त्यांच्याकडे चांगले खेळाडू नाहीये, जसे पाकिस्तानकडे आहेत.
पाकिस्तानच्या माध्यमांशी बोलताना अब्दुल रज्जाक यांनी म्हटले की, “भारतीय संघाकडे पाकिस्तान संघासारखे वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत का? मला वाटत नाही की, भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत दोन हात करू शकेल. पाकिस्तान संघातील खेळाडूंकडे असलेल्या प्रतिभेचे प्रमाण खूप वेगळे आहे. माझ्या मते भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये मालिका होत नाही, ही क्रिकेटसाठी खूप वाईट गोष्ट आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित व्हावी अशी माझी इच्छा आहे. असे जर झाले तर लोकांना कळेल की, पाकिस्तानकडे प्रतिभा आहे, जी भारताकडे नाहीये.”
पाकिस्तानकडे भारतापेक्षा चांगले खेळाडू – अब्दुल रज्जाक
तसेच ते पुढे म्हणाले की, “भारतीय संघ देखील चांगला आहे. त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. जर तुम्ही तुलना केली तर आमच्याकडे इम्रान खान होते तर, त्यांच्याकडे कपिल देव होते. इम्रान खान खूप चांगले खेळाडू होते. याशिवाय आमच्याकडे वसीम अक्रम होते, जर त्यांच्याकडे वसीम सारखा गोलंदाज नव्हता. आमच्याकडे जावेद मियाँदाद होते, तर त्यांच्याकडे गावसकर होते. यासह आमच्याकडे इंजमाम, युसुफ, युनूस, शाहिद आफ्रिदी होते, तर त्यांच्याकडे द्रविड आणि सेहवाग होते. एकंदरीत बघितले तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठे खेळाडू दिले आहेत आणि या सर्व कारणांमुळे भारतीय संघ पाकिस्तान संघाविरुद्ध मालिका खेळत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सचे भवितव्य त्यांच्याच हाती, ‘असे’ आहे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे समीकरण