सध्या बंगळुरू येथे महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी (17 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात शिवमोग्गा लायन्स आणि मंगळूर ड्रॅगन्स आमनेसामने होते. या सामन्यात मंगळूर संघाने चमकदार कामगिरी करत 22 चेंडू शिल्लक असताना 8 विकेट्स राखून एकतर्फी विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना शिवमोग्गा लायन्सने 20 षटकांत 6 बाद 175 धावा केल्या, प्रत्युत्तरात मंगळूर ड्रॅगन्सने 16.2 षटकांतच 2 विकेट्सच्या नुकसानावर 178 धावा करत सामना खिशात घातला. मंगळूरचा रोहन पाटील (40 चेंडूत 72 धावा) याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दरम्यान एका खेळाडूने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले.
अभिनव मनोहरची झंझावाती खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या शिवमोग्गा लायन्सची सुरुवात विशेष झाली नाही आणि धावसंख्या 47 पर्यंत असताना संघाने 4 विकेट्स गमावल्या. अडचणीत सापडलेल्या संघाला सांभाळण्याचे काम अभिनव मनोहर याने केले. मनोहरने एका टोकाकडून प्रतिआक्रमणाची रणनीती वापरून विरोधी गोलंदाजांना तंबी दिली. मनोहरसह डी अविनाश (22 धावा) याने चिवट फलंदाजी करत संघाची धावसंख्या 150 च्या पुढे नेली. अविनाश धावबाद झाल्यानंतर मनोहरने आक्रमण सुरूच ठेवले आणि धावफलकावर 175 धावा लावण्यात विशेष योगदान दिले.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघात समाविष्ट करण्यात आलेल्या मनोहरने मंगळुरूच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि अवघ्या 34 चेंडूत 84 धावा केल्या. शेवटी तो नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी मनोहर रिलीज होऊ शकतो
महाराजा ट्रॉफीमध्ये आपले फलंदाजी कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असली तरीही मनोहरला आयपीएलमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची जास्त संधी मिळालेली नाही. आयपीएल 2025 च्या आधी एक मेगा लिलाव होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व संघांना फक्त काही खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल. त्याच क्रमाने, गुजरात टायटन्स देखील त्यांच्या निवडक खेळाडूंना कायम ठेवण्यास सक्षम असेल आणि त्यांच्याकडे भारतीय खेळाडूंमध्ये बरेच चांगले पर्याय आहेत. याच कारणामुळे गुजरातचा संघ अभिनव मनोहरला मेगा लिलावापूर्वी रिलीज करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सॅल्यूट, मग बूट हवेत फेकला; विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचे विचित्र सेलिब्रेशन पाहून खदखदून हसाल!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?