आयपीएल २०२१ स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच नेहमीप्रमाणे या आयपीएल हंगामातही क्रिकेट रसिकांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल. आयपीएल २०२० स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माने सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार शतक केले आहे. यासह त्याने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला मागे टाकत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यात, पंजाब संघाकडून सलामीचा फलंदाज अभिषेकने अवघ्या ४२ चेंडूत शतकिय खेळी करत लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. यासह तो सूर्यकुमारसह भारतीय दिग्गज विराट कोहलीवरही वरचढ ठरला आहे.
तसेच या यादीत पहिल्या क्रमांकावर युसुफ पठाण आहे. युसुफ पठाणने २०१० साली महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना ४० चेंडूत शतक झळकावले होते.
अभिषेक शर्माचे शतक ठरले व्यर्थ
या सामन्यात मध्य प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करतांना ५० षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद ४०२ धावा केल्या होत्या. यात वेंकटेश अय्यर याने सर्वाधिक १४६ चेंडूमध्ये १९८ धावांची खेळी केली. यात ७ षटकार आणि २० चौकरांचा समावेश होता. तसेच आदित्य श्रीवास्तव याने ५६ चेंडूत ८८ धावांची तुफानी खेळी केली. पंजाब संघाकडून गोलंदाजी करतांना सिध्दार्थ कौलने ८८ धावा खर्च करत १ गडी बाद केला. तर बरिंदरला देखील एक गडी बाद करण्यात यश आले.
४०३ धावांचा पाठलाग करायला आलेल्या पंजाब संघाचा पूर्ण डाव २९७ धावांवर आटोपला. पंजाब संघाकडून अभिषेक शर्मा याने ४९ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. यात ९ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कुठल्याच फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मध्यप्रदेश संघाकडून गोलंदाजी करताना मिहिर हिरवानीने ६२ धावा देत ४ गडी बाद केले. तसेच १९८ धावा करणाऱ्या अय्यरने २ गडी बाद केले.
हे आहेत लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारे भारतीय फलंदाज
१) युसुफ पठाण – ४० चेंडू ( विरुद्ध महाराष्ट्र,२०१० )
२)अभिषेक शर्मा – ४२ चेंडू ( विरुद्ध मध्यप्रदेश,२०२१)
३)सूर्यकुमार यादव – ५० चेंडू (विरुद्ध पुडुचेरी,२०२१)
४)विराट कोहली – ५२ चेंडू ( विरुद्ध ऑस्ट्रेलिया,२०१३)
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG: “आशिया कपचं आयोजन टीम इंडियाच्या जय-पराजयावर निर्भर”
INDvsENG: टीम इंडियाने इंग्लंडच्या ‘या’ उणीवेचा फायदा घेतला; माजी दिग्गजाने मांडले मत
बड्डेच्या दिवशीच क्रिकेटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, कोरोना झाल्यामुळे करावं लागलं दाखल