आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेची सुरुवात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मासाठी निराशाजनक राहिली. तो लागोपाठ तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिषेक आणि भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल यांनी मनमोकळी चर्चा केली. त्यामध्ये अभिषेकला गिलने सल्ला दिला होता, असे सांगितले.
अभिषेकने टी२० विश्वचषकात तीनदा शून्यावर बाद होणाच्या या कडव्या आठवणीला विनोदाचे स्वरुप दिले. त्या कार्यक्रमामध्ये गिलने स्पर्धेआधी अभिषेकला काही सल्ला दिला होता का, असे विचारले गेले. त्यावर तो हसून म्हणाला, “टी२० मध्ये जागतिक क्रमांकवर अव्वल स्थानावर असणाऱ्या फलंदाजाला कोण सल्ला देईल?” त्याचे हे उत्तर ऐकताच प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही. अभिषेकने मात्र यावेळी एक वेगळाच खुलासा केला आहे.
अभिषेक म्हणाला, “मी लागोपाठ तीनवेळा शून्यावर बाद झाल्यावर मीच त्याला मॅसेज केला आणि म्हटले मी आणखी एक विक्रम करण्यापूर्वी मला त्याची बॅट दे.”
त्यावेळी शुबमनच्या प्रतिक्रियेबाबतही अभिषेक म्हणाला, “शुबमन मला म्हणाला, ‘तू हे करशील.'”
हा संवाद धावांवरून फलंदाजीकडे वळाला. त्यामध्ये अभिषेकला विचारले गेले की कोणाची बॅट त्याला सर्वात अधिक आवडते? तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता ‘शुबमनची’ असे उत्तर दिले.
शुबमननेही त्यावर म्हटले, “तो नेहमी माझ्याच बॅटने खेळतो.”
अभिषेकने टी२० विश्वचषकच्या अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी केली. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात केवळ १८ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. यामुळे तो टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू ठरला. त्याने त्या सामन्यात २१ चेंडूत ५२ धावा केल्या आणि संजू सॅमसनसोबत ९८ धावांची सलामीची भागीदारी केली. त्यामुळे भारताला त्या सामन्यात उत्तम सुरूवात मिळाली.
भारताने तो सामना ९६ धावांनी जिंकला आणि तिसरे विक्रमी टी२० विश्वचषक उंचावला.






