भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मार्च महिन्यात जेव्हा इंग्लंडने भारतात कसोटी मालिका खेळली होती. त्यावेळी इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंड संघ या मालिकेत पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार हे नक्की.
इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त असते. पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी कशी असेल? याचा खुलासा इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजाने केला आहे.
इंग्लंड संघाचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने खुलासा करत म्हटले की, “खेळपट्टीचा जो फोटो समोर आला आहे. तो सामना सुरू होण्याच्या तीन दिवसापूर्वीचा आहे. यात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. ते गवत कापतील आणि त्यावर रोलर देखील फिरवतील. जर खेळपट्टीवर गवत राहीले; तर भारतीय संघाकडे देखील चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. मी अशी आशा करतो की, खेळपट्टी चांगली असेल, ज्यामध्ये गोलंदाजाला गती मिळेल. तसेच गोलंदाजाला खेळपट्टीतून बाऊन्स देखील मिळायला हवा. कारण स्विंग तर मिळतोच पण त्यासोबतच जर बाऊन्स मिळाला; तर चेंडू बॅटचा कडा घेत फलंदाज झेलबाद होण्याची दाट शक्यता असते.”(According to James Anderson pitch of first test match will help pacers)
भारतीय संघाला अडचण नसेल
“आम्ही जर खेळपट्टीवर काही गवत ठेवले; तर मला नाही वाटत की भारतीय खेळाडू त्याची तक्रार करतील. कारण भारतीय दौऱ्यावर असताना आम्ही त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या परिस्थितीत खेळलो होतो. त्यांनी आपल्या फायद्यासाठी अनुकूल परिस्थितीचा वापर केला. जगभरातील अनेक संघ असे करतात,” असे जेम्स अँडरसनने भारतीय पत्रकारांना सांगितले.
रिषभ पंत निडर फलंदाज
तसेच पुढे त्याने म्हटले की, “आयपीएलच्या काळातील हे फलंदाज निडर होऊन फलंदाजी करतात. रिषभ पंतचं उदाहरण घ्या, मी नवीन चेंडूने गोलंदाजी करत असताना तो रिव्हर्स स्विप शॉट खेळत होता. तुम्ही सौरव गांगुलीला असं करताना कधीच पाहिलं नसेल.”
भारतीय संघाची फलंदाजी मजबूत
“भारतीय संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. तुम्ही फक्त एका फलंदाजावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. विराट कोहली हा आमची महत्वपूर्ण विकेट असेल. तो संघाचा कर्णधार आहे. तसेच चेतेश्वर पुजारा एक असा फलंदाज आहे, जो खूप वेळ फलंदाजी करू शकतो. त्यामुळे तो देखील एक महत्वाचा फलंदाज आहे,” असेही त्याने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना? जाणून घ्या सर्वकाही
वडिलांच्या आठवणीने आजही विराट होतो भावूक; म्हणाला, ‘आज ते इथे असते तर..’
याला म्हणतात धमाकेदार पदार्पण! हंगामातील पहिल्याच चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने घेतली विकेट