विराट कोहली (virat kohli) याने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर नवीन कर्णधार कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रोहित शर्मा सध्या भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. अशात निवडकर्ते त्याच्यावर कसोटी संघाचे नेतृत्व सोपवतील, याबाबत संभ्रम आहे. याचा पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांनी भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराविषयी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ (steve smith) या यादीत सामील झाला आहे.
स्टीव स्मिथने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून चाहत्यांसोबत लाइव सेशन केले. यावेळी त्याला भारतीय संघाच्या नवीन कसोटी कर्णधाराविषयी प्रश्न विचारला गेला. प्रश्नावर उत्तर देताना स्मिथ म्हणाला की, “सर्वप्रथम मागच्या सहा – सात वर्षांपासून भारताचे यशस्वीपणे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीला शुभेच्छा. त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. माझ्या मते रोहित शर्मा आणि केएल राहुल नेतृत्वासाठी दोन सक्षम दावेदार आहेत.”
दरम्यान, मागच्या चार ते पाच महिन्यात भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळाले. संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींसोबत विराट कोहलीचे मतभेद जगासमोर आले. विराटने सुरुवातीला भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले, नंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले. अशात त्याने दक्षिण अफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले.
विराटने कामाच्या ताणामुळे टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. टी२० विश्वचषक २०२१ पार पडल्यानंतर त्याने म्हटल्याप्रमाणे टी-२० संघाचे नेतृत्व सोडले. पण यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी त्याच्याकडून बीसीसीआयने एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेतले. गांगुलींच्या मते, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक नेतृत्व असणे योग्य असते आणि याच कारणास्तव रोहित शर्माला ही जबाबदारी दिली गेली.
गांगुलींनी यावेळी असेही सांगितले होते की, त्यांनी स्वतः विराटला टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती आणि विराटने त्यांचे सांगणे ऐकले नाही. मात्र, विराटनेही दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि गांगुलींचे नाव न घेता त्यांनी सांगितेल्या सर्व गोष्टी चुकीच्या ठरवल्या. यावेळी विराटने सांगितल्याप्रमाणे, टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे त्याला कोणीच म्हटले नव्हते. याचसोबत एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेताना देखील त्याला फक्त ९० मिनिट आधी कल्पना दिली गेली होती. या सर्व गोंधळात जेव्हा दक्षिण अफ्रिकेकडून भारताला कसोटी मालिकेत पराभव मिळाला, त्यानंतर विराटने कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले.
महत्वाच्या बातम्या –
वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर
आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांवर लागू शकते कोटींची बोली, १० संघांमध्ये रंगणार रंजक लढत
व्हिडिओ पाहा –