मुंबई इंडियन्सला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. यानंतर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हार्दिकच्या गोलंदाजीशिवाय त्याच्या फलंदाजीवरही सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चेन्नईविरुद्ध हार्दिक पांड्यानं 3 षटकात 43 धावा दिल्या. सामन्याच्या अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीनं त्याला 4 चेंडूत 20 धावा ठोकल्या. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याचवेळी, फलंदाजी करताना हार्दिकनं 6 चेंडूत अवघ्या 2 धावा केल्या. त्यामुळे आता तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ॲडम गिलख्रिस्टनं हार्दिक पांड्यावर एक मोठं वक्तव्य केलंय.
ॲडम गिलख्रिस्टच्या मते, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही. विशेषत: महेंद्रसिंग धोनीनं ज्या प्रकारे हार्दिकला शेवटच्या षटकात सलग 3 षटकार ठोकले, यानंतर त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ॲडम गिलख्रिस्टनं हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु त्यानं हार्दिकचं कौतुकही केलं. “हार्दिक पांड्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो आव्हानासाठी तयार आहे. मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे असं मला वाटत नाही”, असं गिलख्रिस्ट म्हणाला.
मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकात 4 विकेट गमावत 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 6 विकेट गमावून केवळ 186 धावाच करू शकला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सला 20 धावांनी पराभवाला सामोरं जावे लागलं.
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स 6 सामन्यांत 4 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्याचवेळी, या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचे 6 सामन्यांत 4 विजय झाले असून, ते 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मुंबईचा पुढील सामना 18 एप्रिलला पंजाबविरुद्ध मोहालीच्या मैदानावर आहे. तर चेन्नई आपला पुढील सामना 19 एप्रिलला लखनऊविरुद्ध खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय! ‘हिटमॅन’ सारखा दुसरा कोणीच नाही!
‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!
कॅच घ्यायला गेला अन् पॅन्टच निसटली! वानखेडेच्या मैदानावर रोहित शर्माची फजिती; पाहा VIDEO