दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी बांगलादेश संघाचा डाव अवघ्या ७३ धावांवर संपुष्टात आणला होता. यामध्ये ॲडम झांपाने मोलाचे योगदान दिले होते. या सामन्यात त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली असती, परंतु यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकडून एक मोठी चूक झाली. त्यानंतर ॲडम झांपा आणि मॅथ्यू वेड यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ॲडम झांपाने या सामन्यात १९ धावा देत ५ गडी बाद केले होते. या दरम्यान तो विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरू शकला असता. परंतु निर्णायक क्षणी मॅथ्यू वेडने झेल सोडला, ज्यामुळे ॲडम झांपाचा हा मोठा विक्रम होता होता राहून गेला. ॲडम झांपाने ११ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद केले होते. त्यानंतर हॅटट्रिक चेंडू तस्किन अहमदच्या बॅटचा कडा घेऊन गेला आणि मॅथ्यू वेडने झेल सोडला.
आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ॲडम झांपा आणि मॅथ्यू वेड संवाद करताना दिसून येत आहेत. झेल सुटल्यानंतर ॲडम झांपा मॅथ्यू वेडला म्हणतोय की, “हा माझा हॅटट्रिक चेंडू होता.” यावर प्रतिसाद देत मॅथ्यू वेड म्हणाला की, “हो, मी हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता.”
https://www.instagram.com/reel/CV2ibd-lwFL/?utm_medium=copy_link
या कामगिरीच्या जोरावर ॲडम झांपाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, “मी माझ्या प्रदर्शनाने खूप खुश आहे. हॅटट्रिक चेंडूवर जो चेंडू मॅथ्यू वेडच्या हातात गेला होता तो कठीण होता. मी ३ किंवा ४ षटकांपूर्वी सलग २ चेंडूवर २ गडी बाद केले आहेत. अनेकदा मला आठवण देखील राहत नाही की, मी हॅटट्रिकवर आहे. ॲस्टन एगरच्या अनुपस्थितीत माझी भूमिका वेगळी होती.”
या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ७३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने अवघ्या ६.२ षटकात आव्हान गाठले आणि ८ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला अजून एका मोठ्या विजयाची आस, स्कॉटलँडशी पहिल्यांदाच करणार दोन हात
एकसारखेच, पण आहेत वेगवेगळे! अफगाणिस्तानला मिळाला ‘बुमराह’, गोलंदाजी ऍक्शनचा व्हिडिओ चर्चेत