आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झगडताना दिसतो आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध पराभवाची चव चाखल्यानंतर अखेर भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध विजयाचे खाते उघडण्यात यश आले आहे. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानला ६६ धावांनी धोबीपछाड दिला. त्यानंतर आता शुक्रवार रोजी (०५ नोव्हेंबर) त्यांच्यापुढे स्कॉटलँड संघाचे आव्हान असणार आहे.
दुबईच्या मैदानावर हा सामना रंगणार असून भारतीय संघाचा हा टी२० विश्वचषकातील चौथा सामना असेल. उपांत्य फेरीचे तिकीट पक्के करण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने या सामन्यात बाजी मारावी लागणार आहे. भारताबरोबरच स्कॉटलँड संघाचाही हा टी२० विश्वचषकातील चौथा सामना असेल.
या सामन्याआधीच्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला फक्त १ विजय मिळवता आला आहे तर २ सामन्यात पराजय झाला आहे. यासह भारतीय संघ गट २ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे स्कॉटलँड संघ आतापर्यंतच्या तिन्हीही सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे त्यांना गुणातालिकेत शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारत आणि स्कॉटलँड संघ आमने सामने येणार आहेत. यापूर्वी २००७ मध्ये उभय संघांची टक्कर होणार होती. परंतु तो सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. स्कॉटलँड संघापेक्षा भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव जास्त असल्याने या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जास्त जड आहे. परंतु त्यांची दुबईच्या मैदानावरील कामगिरी तितकी खास राहिलेली नाही. भारतीय संघाला आतापर्यंत दुबईत खेळलेले टी२० सामने जिंकता आले नाहीत.
भारत आणि स्कॉटलँडच्या प्लेइंग इलेव्हनविषयी बोलायचे झाल्यास, भारतीय संघाच्या अंतिम एकादशमध्ये बदल होण्याची फार कमी शक्यता आहे. परंतु स्कॉटलँड संघात एक बदल असू शकतो. स्कॉटलँडचा वेगवान गोलंदाज जोश डावे याला ग्रोइनची दुखापत झाल्याने त्याच्याजागी दुसऱ्या गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह
स्कॉटलँडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जॉर्ज मुन्से, काइल कोएत्जर (कर्णधार), रिची बैरिंगटन, मैथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), अलास्डेयर इवांस, क्रिस ग्रीव्स, माइकल लीस्क, कैलम मैकलियोड, सफ्यान शरीफ, मार्क वॅट, ब्रैडली व्हील
महत्वाच्या बातम्या-
स्कॉटलँडविरुद्ध भारताला ‘मोठ्या विजया’ची गरज, माजी क्रिकेटरने संघ निवडीबाबत दिला ‘हा’ सल्ला
टी२० संघात पुनरागमन झाल्याने अश्विन झाला भावुक, तिखट प्रत्युत्तराने टीकाकारांना केले गपगार