संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली. सुपर १२ फेरीच्या पहिल्या दिवशीचा दुसरा सामना गतविजेत्या वेस्ट इंडीज व इंग्लंड यांच्या दरम्यान झाला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ५५ धावांवर गुंडाळल्यानंतर पाच गडी गमावत हे आव्हान पूर्ण केले. या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद याने एक ऐतिहासिक स्पेल टाकत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
इंग्लंडची भेदक गोलंदाजी
इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाने बळी मिळवताना वेस्ट इंडीजच्या तगड्या फलंदाजी क्रमाला खिळखिळे केले. इंग्लंडसाठी टायमल मिल्स व मोईन अलीने दोन, वोक्स व जॉर्डन यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. तर फिरकीपटू आदिल रशीदने चार बळी मिळवत सर्वोत्तम गोलंदाजी केली.
रशीदचा ऐतिहासिक स्पेल
या सामन्यामध्ये इंग्लंडने लेगस्पिनर आदिल रशीदला संधी दिली. त्याने या सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करताना २.२ षटके टाकत अवघ्या दोन धावा देत १२ निर्धाव चेंडू टाकून चार बळी मिळवले. इंग्लंडसाठी ही सर्वोत्तम टी२० गोलंदाजी आकडेवारी ठरली. यापूर्वी ख्रिस जॉर्डनने २०१६ टी२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध २८ धावा देऊन चार गडी बाद केले होते. तसेच कोणत्याही फिरकीपटूकडून टी२० विश्वचषकात टाकलेला हा तिसरा सर्वोत्कृष्ट स्पेल ठरला. त्याबरोबरच सर्वात कमी धावा देऊन टी२० विश्वचषकात चार बळी घेण्याची कामगिरी केली. श्रीलंकेच्या रंगाना हेराथने २०१४ टी२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध ३ धावा देऊन पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारत विजेतेपदाचा दावेदार असला, तरी प्रबळ दावेदार नाही’, माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य
“हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तरी तो मॅन विनर”, विराटचे टीकाकारांना प्रत्युत्तर






