शनिवारी (दि. 24 जून) हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या क्वालिफायरमधील 13वा सामना पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज संघ आमने-सामने होते. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने 35 धावांनी शानदार विजय मिळवत मोठा उलटफेर केला. या पराभवानंतर वेस्ट इंडिज संघाच्या विश्वचषकात पोहोचण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. झिम्बाब्वे संघाच्या या विजयाचा हिरो ठरलेल्या ‘सामनावीर’ सिकंदर रझा याने सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सिकंदर?
वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझा याने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने आधी बॅटमधून 58 चेंडूत 68 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिज संघाला दिलेल्या 269 धावांचा बचाव करताना 8 षटके गोलंदाजीत 36 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर संघाच्या योजनेविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी संघसहकाऱ्यांना म्हणालो होतो की, शौर्याने लढत राहा. जर आपण असे केले, तर बाकीचे काम आपले कौशल्य करतील. आपण जगातील सर्वोत्तम संघ बनण्यापासून काही पावले दूर आहोत.”
‘भारतात जाण्याची भूक’
पुढे बोलताना रझा म्हणाला की, “आमची गोलंदाजी शानदार आहे. तरीही मला वाटले होते की, आम्ही 20 ते 30 धावा कमी केल्या. मात्र, आमची भारतात जाण्याची जी भूक आहे, त्याने या कमी धावांची भरपाई केली. मला वाटत नाही की, आम्ही फक्त आमच्या कौशल्यांनी जिंकू शकत होतो. प्रेक्षकांनीसुद्धा एक मोठी भूमिका बजावली आहे.”
विश्वचषक क्वालिफायरमधील 13व्या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात 10 विकेट्स गमावून 268 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दोन वेळचा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा डाव 44.4 षटकात फक्त 233 धावांवरच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. अशाप्रकारे झिम्बाब्वे संघाने 35 धावांनी सामना जिंकला.
गुणतालिकेची स्थिती
क्वालिफायर फेरीत 10 संघ दोन गटात विभागले गेले आहेत. यातील अ गटात झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्ट इंडिज संघांनी सुपर-6मध्ये प्रवेश केला आहे. तसेच, ब गटातून अद्याप कोणत्याही संघाला सुपर-6 संघात प्रवेश मिळवता आला नाहीये. मात्र, श्रीलंका, ओमान आणि स्कॉटलँड संघ सुपर-6मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे.
अव्वल-2 संघ करणार विश्वचषकासाठी क्वालिफा
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धा 10 संघात खेळली जाणार आहे. यासाठी 8 संघ स्पर्धेसाठी थेट पात्र झाले आहेत, तर अंतिम 2 संघ क्वालिफायर फेरीत अव्वलस्थानी राहून विश्वचषकात पोहोचतील. (after defeating west indies in odi world cup qualifier match winner sikandar raza said this know here)
महत्वाच्या बातम्या-
ईशांतने उलगडला विराटचा जीवनप्रवास, सांगितले सुरुवातीपासून आजपर्यंतचे किस्से, नक्की वाचा
गुरू योगेश्वर दत्त आणि शिष्य बजरंग पुनियाने ठोकले एकमेकांविरुद्ध शड्डू! एशियन गेम्स ट्रायलवरून नवा वाद