श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला नुकतेच आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी 20 मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही दौऱ्यात भारताचा ऐतिहासिक क्लीन स्वीप झाला. भारताने आयर्लंडविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध सलग चार सामने गमावले.
सलग टी 20 मालिकांमधील या दारुण पराभवानंतर खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने त्यामध्ये उडी घेतली आहे.
एबी डिव्हिलिअर्सने संघाची रणनीती प्रभावी ठरली नाही, त्यामुळे गंभीरकडे बोट दाखवले जाईल, असे म्हणत निशाना साधला आहे.
“टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काळजी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अनेकांच्या नजरा आणि बोटं गंभीरकडे असतील. संघ आता कशी प्रगती करेल याची त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. कदाचित यामधून थोडं शिकणं काही वाईट गोष्ट नव्हती. आयपीएलमध्ये भरपूर धावा करणाऱ्या खेळाडूंना थोडे जमिनीवर आणा. त्यांना समजू द्या की हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक-दोन गिअरपेक्षा जास्त गिअर असले पाहिजेत. तुम्ही नेहमीच पाचव्या गिअरमध्ये खेळू शकत नाही,” असे डिव्हिलिअर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे.
या भारतीय संघामध्ये अनुभवाची कमतरता होती आणि लोकांनीही संघासोबत थोडा संयम बाळगाला पाहिजे, असेही डिव्हिलिअर्सने म्हटले आहे
“भारताला 0-4 ने पराभूत होताना पाहणे कठीण होते. मला वाटलेच नव्हते की असे काही होईल. ते पूर्णपणे अनपेक्षित होते, कारण संघात अनुभवाची कमतरता होती. अशा स्थितीत नेतृत्व महत्त्वाचे ठरते. सर्वजण गंभीरकडे बोट दाखवत असले तरी त्यासाठी काही तो एकटाच जबाबदार नाही. तुम्हाला काही एका रात्रीत जसप्रीत बुमराह, विराट कोहली किंवा रोहित शर्मा मिळणार नाही, त्यासाठी लोकांनी थोडा संयम बाळगावा,”, असे डिव्हिलिअर्सने पुढे म्हटले आहे.
टी 20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारताने वनडे मालिकेची सुरूवात चांगली केली आहे. संघाने तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (after india 0-4 lost vs england in t20 series Fingers will inevitably be pointed at Gautam Gambhir says AB de Villiers)






