दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात येत आहे. साखळी फेरीतील मोजकेच सामने बाकी राहिल्याने प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट होत आहे. शुक्रवारी(१ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ हंगामाचा ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सला फायदा झाला आहे. त्यांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
दिल्लीसाठी प्लेऑफचे दरवाजे खुले
आयपीएल २०२१ मध्ये ४५ सामन्यांपर्यंत विचार केला, तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांचे साखळी फेरीतील प्रत्येकी १२ सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे आता त्यांचे साखळी फेरीत केवळ प्रत्येकी २ सामने उरले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी ११ सामने खेळून झाले आहे. त्यामुळे या ६ संघांचे साखळी फेरीत प्रत्येकी ३ सामने बाकी आहेत.
तसेच गुणतालिकेत सध्या चेन्नई १८ गुणांसह अव्वल क्रमांकावर असून दिल्ली १६ गुणांसह दुसऱ्या आणि बेंगलोर १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचे समान १० गुण आहेत. पण नेटरनरेटच्या फरकामुळे हे तीन संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तर राजस्थान ८ गुणांसह सातव्या आणि हैदराबाद ४ गुणांसह शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहेत.
त्यामुळे या गुणतालिकेचा विचार करता १८ गुणांपर्यंत पोहचण्याची संधी केवळ आता दिल्ली आणि बेंगलोरकडे आहे, त्यामुळे चेन्नईने यापूर्वीच प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. तसेच पंजाबने शुक्रवारी कोलकाताला पराभूत केल्याने आता कोलकाता १४ पेक्षा अधिक गुण मिळवू शकणार नाहीत. तसेच सध्या १६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवण्याची संधी केवळ बेंगलोर आणि मुंबईकडे असल्याने दिल्लीने प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. तसेच हैदराबाद १० पेक्षा अधिक गुण मिळवू शकत नसल्याने ते यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
उर्वरित २ जागांसाठी संघर्ष
दिल्ली आणि चेन्नईने आधीच प्लेऑफचे तिकीट मिळवले असल्याने आता केवळ २ जागा शिल्लक आहेत. त्यातही हैदराबाद या शर्यतीत नसल्याने अन्य ५ संघांत उर्वरित २ जागांसाठी संघर्ष आहे. यातील बेंगलोरसाठी ही शर्यत सर्वात सोपी आहे. कारण त्यांचे १४ गुण आहेत आणि त्यांनी आणखी एक जरी विजय मिळवला तरी त्यांचे प्लेऑफमधील स्थान पक्के होईल. पण, जर त्यांना उर्वरित साखळी फेरीतील सर्व ३ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला तर मात्र, मोठी समस्या होऊ शकते.
तसेच कोलकाता, मुंबई, पंजाब आणि राजस्थान या चार संघात कडवी स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित सर्व सामने करो या मरो अशाच स्थितीतील आहेत.
A look at the Points Table after Match 45 of #VIVOIPL.
Which two teams do you reckon will join #CSK and #DelhiCapitals out there? pic.twitter.com/AuxGtgMXtk
— IndianPremierLeague (@IPL) October 1, 2021
त्यामुळे आता कोण कोणावर कुरघोडी करणार आणि प्लेऑफसाठीची समीकरने कशी बदलणार हे येणाऱ्या सामन्यांमध्ये पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पीटरसनने खेळाडूंना प्रभावित करु नये, तुम्हाला यायचे नसेल तर येऊ नका’, टीम पेन भडकला
सांगली एक्सप्रेस सुसाट! मंधनाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीसह ७२ वर्षे जुन्या विक्रमालाही धक्का