भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर घराबाहेर सरावास पुन्हा सुरुवात करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्यानंतर आता अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरनेही सरावास सुरुवात केली आहे. त्याने त्याचे वडील एम. सुंदर यांच्यासह चेन्नईमध्ये स्थानिक मैदानात सराव केला. त्याने यावेळी फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.
स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सुंदर म्हणाला, ‘मला माझ्या गोलंदाजीबद्दल आत्मविश्वास आहे. मला वाटते मी माझ्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येण्यासाठी माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायला हवे.’
तसेच फलंदाजीदरम्यान पाया मजबूत ठेवण्यावर, डोके स्थिर ठेवण्यावर आणि चेंडू जवळून पहाण्याकडे लक्ष देत असल्याचेही त्याने सांगितले.
सुंदरने फलंदाज म्हणूनच २०१६ ला १९ वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळवले होते. एवढेच नाही तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतानाही अनेकदा चांगले फलंदाजी प्रदर्शन केले आहे.
त्याबद्दल तो म्हणाला, ‘मी प्रामुख्याने सलामीवीर फलंदाज आहे. पण मी जेव्हा भारताच्या १९ वर्षांखालील संघात सामील झालो तेव्हा प्रशिक्षक राहुल द्रविड सरांनी मला मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले आणि मला आणखी स्पिन गोलंदाजी करण्यास सांगितली. मी त्या गोष्टीशी जुळवून घेतले.’
भारताकडून मात्र सुंदर प्रामुख्याने गोलंदाजीची भूमीका निभावतो तर खालच्या फळीत फलंदाजीला येतो. याबद्दल तो म्हणाला, ‘मी भारताकडून ६ व्या किंवा ७ व्या क्रमांकावर टी२० सामन्यात खेळण्यासाठी येतो. मी या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या आव्हानाचा आनंद घेत असतो.’
सध्या भारतात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात खेळाडूंना आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
विश्वचषकासाठी निवड होऊनही एकाही सामन्यात संधी न मिळालेले भारताचे अभागी खेळाडू
रोहितने फोटो शेअर केल्यानंतर उघडला ‘त्या’ दोघांच्या मैत्रीचा पेटारा
चाहत्यांनी सांगितले म्हणून केस कापलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा पहा नवा लुक