आज (8 मार्च) मेलबर्न येथे आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम सामना पार पडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (INDWVsAUSW) प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
हा महिला टी20 विश्वचषकाचा 7 वा हंगाम आहे. याआधी झालेल्या 6 टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात अवघ्या 2 वेळेला नाणेफेक जिंकणाऱ्या संघांना विजय मिळवता आला आहे.
2009मध्ये न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील पहिला अंतिम सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली. पण, विजयाचा मान मात्र इंग्लंड संघाला मिळाला होता. पुढे ऑस्ट्रेलिया संघाने 2018पर्यंत सलग 5वेळा अंतिम फेरित प्रवेश केला.
मात्र, त्यांना नाणेफेक जिंकल्यानंतर केवळ 2 वेळाच विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यांनी 2010मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी20 विश्वचषकातील दुसरा तर त्यांचा पहिलाच अंतिम सामना खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत विश्वचषकही जिंकला.
2012मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आले. यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकत सामन्याची सुरुवात केली खरी पण विजय मात्र ऑस्ट्रेलियाच्याच वाट्याला आला. तर, 2014मध्ये इंग्लंडविरुद्धच्याच अंतिम सामन्यात ऑस्टेलियाने नाणेफेक जिंकत विजयही मिळवला.
तर वेस्ट इंडिज विरुद्ध 2016मध्ये अंतिम सामना खेळताना ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली होती. मात्र, विजय वेस्ट इंडिज संघाच्या वाट्याला आला. तर 2 वर्षांपूर्वी 2018 ला झालेल्या टी20 विश्वचषकात आस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात अंतिम सामना पार पडला. यावेळेलाही इंग्लंडने नाणेफेक जिंकली पण ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.
आता आजच्या अंतिम सामन्यात कोणता संघ नाणेफेक जिंकेल आणि कोणत्या संघाला विजेतेपद मिळेल हे पाहणे उस्तुकतेचे ठरेल.






