जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचे बिगुल वाजले आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी लखनऊ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रॅंचाईजींचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही संघांना मेगा लिलावात सहभागी होण्यापूर्वी प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने दोन्ही संघांना २२ जानेवारी ही ड्राफ्ट खेळाडूंची नावे घोषित करण्यासाठी अंतिम तारीख दिली होती. त्यानुसार, सीवीसी कॅपिटल्स या आंतरराष्ट्रीय कंपनीची मालकी असलेल्या अहमदाबाद फ्रॅंचाईजीने आपल्या तिन्ही खेळाडूंची नावे जाहीर केली.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या (१५ कोटी), अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान (१५ कोटी) व भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल (८ कोटी) हे अहमदाबाद संघाशी करारबद्ध झाले आहेत.
इंग्लंडमधील प्रसिद्ध सीव्हीसी कॅपिटल्सकडे अहमदाबाद संघाची मालकी आहे. अहमदाबाद संघाचे संचालक व इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी यांनी आपल्या तीन ड्राफ्ट खेळाडुंची घोषणा केली. खेळाडूंची घोषणा करताना ते म्हणाले,
“या नव्या प्रवासाची सुरुवात करताना आम्हाला आनंद होतोय. हार्दिक, राशिद व शुबमन यांच्या रूपाने आम्ही आमच्या तीन गुणवान खेळाडूंची घोषणा करतो. हार्दिककडे संघाचे नेतृत्व असेल. या नव्या जबाबदारीबाबत आम्ही आश्वस्त आहोत. त्याला मुंबईसह अनेक आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा अनुभव आहे. राशिदसारखा मातब्बर खेळाडू संघाला मजबूत बनवेल. तर, गिल किती प्रतिभावान आहे, हे आपण सर्वांनी पाहिलेय.”
या नव्या आयपीएल संघाचे मेंटर म्हणून भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर, भारताला २०११ वनडे विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावतील
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: १७ कोटीत लखनऊकर झाला राहुल; स्टॉयनिस-बिश्नोई साथीला (mahasports.in)