पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या सेमी फायनल मध्ये पहिली लढत अहमदनगर विरुद्ध सांगली यांच्यात झाली. पहिल्याच चढाईत अहमदनगरच्या आदित्य शिंदे ने गुण मिळवत अहमदनगर संघाचा खात उघडला. सांगलीच्या पहिल्या चढाईत अभिषेक गुंगेची पकड करत अहमदनगर संघाने आपले इरादे पक्के केले होते. त्यानंतर अभिषेक गुंगे व अभिराज पवार ने काही गुण मिळवत अहमदनगर संघाला मोठी आघाडी मिळू दिली नाही. अहमदनगर च्या शिवम पठारे ने झटापट चढाया करत गुण मिळवले. 12 व्या मिनिटाला अहमदनगर संघाने सांगली संघाला ऑल आऊट करत 17-05 अशी आघाडी मिळवली होती.
अहमदनगर संघ एकतर्फी लढत करेल असा वाटत असताना अभिषेक गुंगे ने सुपर रेड करत सामन्यात रंगत आणली. मध्यंतराची 4 मिनिट शिल्लक असताना सांगली संघाने अहमदनगर संघाला ऑल आऊट करत 15-20 अशी पिछाडी कमी करत सामन्यात चुरस आणली. मध्यंतरा पूर्वी आदित्य शिंदे ने गुण मिळवत अहमदनगर संघाला 24-18 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा नंतर दोन्ही संघानी सावध खेळ केला. 27-21 अशी आघाडी अहमदनगर कडे असताना आदित्य शिंदे ने सुपर रेड करत 30-21 अशी आघाडी मिळवली. त्याला प्रतिउत्तर देत अभिराज पवार ने 4 गुणांची सुपर रेड 25-30 अशी पिछाडी कमी केली.
आदित्य शिंदे व शिवम पठारे पुढील चढाईत गुण मिळवत 12 मिनिटं शिल्लक असताना सांगली संघाला ऑल आऊट करत 36-26 अशी आघाडी मिळवली. उत्तरार्धात अहमदनगर संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करत सामना 50-34 असा जिंकला. अहमदनगर संघाकडून शिवम पठारे ने चढाईत 15 तर आदित्य शिंदे ने चढाईत 13 गुण मिळवले. अभिषेक पवार 4 उत्कृष्ट पकडी केल्या. सांगली कडून अभिराज पवार ने 12 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- शिवम पठारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- अभिषेक पवार, अहमदनगर
कबड्डी का कमाल – अभिराज पवार, सांगली