दिवा गावदेवी क्रीडा महोत्सव मैदान, दिवा पूर्व येथे सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा पार पडली.
पुरुष विभागात एयर इंडिया संघाने तर महिलांना मध्ये डब्लू. टी. ई. संघाने विजेतेपद पटाकवले.
महिला विभागात यजमान ठाणे मनपा विरुद्ध बलाढ्य डब्लू. टी. ई. यांच्यात अंतिम लढत झाली. तुल्यबल डब्लू. टी. ई. समोर ठाणे मनपा संघर्ष करतांना दिसला. मध्यंतरापर्यत दोन लोन टाकत डब्लू. टी. ई. संघाने २४-०७ अशी भक्कम आघाडी मिळवली.
सायली केरीपले व स्नेहल शिंदे यांच्या आक्रमक चढाया समोर मनपाची बचावफळी निष्पळ ठरली. अंकिता जगताप व सायली जाधव यांनी चांगल्या पकडी केल्या. ठाणे मनपा कडून कोमल देवकर, सायली नागवेकर व मेघा कदम यांनी चांगला खेळ केला पण त्याना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. सुहास जोशींच्या मार्गदर्शनाखाली डब्लू. टी. ई. संघाने ३९-१६ असा विजय मिळवत विजेतेपद पटाकवले.
तर पुरुष विभागात पुन्हा एकदा एयर इंडिया संघाची मक्तेदारी बघायला मिळाली. एयर इंडियाने सेंट्रल बँकेचा ३३-१२ असा पराभव करत मोसमातील चौथे विजेतेपद पटाकवले. एयर इंडिया कडून सुशांत साहिल, पंकज मोहीते, असलम इनामदार, विकास काळे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. महिला विभागात ठाणे मनपा संघाची कर्णधार कोमल देवकरला मालिकवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर पुरुष विभागात एयर इंडियाचा पंकज मोहिते मालिकावीर ठरला.
अंतिम संक्षिप्त निकाल:
महिला विभाग:
१) डब्लू. टी. ई. उपनगर
२) ठाणे मनपा, ठाणे
३) इमरॉल्ड इन्फ्रा, मुंबई
४) देना बँक, मुंबई
मालिकावीर: कोमल देवकर (ठाणे मनपा)
पुरुष विभाग:
१) एयर इंडिया, मुंबई
२) सेंट्रल बँक, मुंबई
३) देना बँक, मुंबई
४) न्यु इंडिया इन्शुरन्स, मुंबई
मालिकावीर: पंकज मोहिते ( एयर इंडिया)