आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) दिला जाणारा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player Of The Month) पुरस्कार जाहीर करण्यात आला. डिसेंबर २०२१ या महिन्यासाठी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याची निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्ध मुंबई कसोटीत त्याने एकाच डावात सर्वच्या सर्व दहा गडी बाद करण्याची किमया केली होती. (Ajaz Patel 10 Wickets) त्याने या पुरस्कारामध्ये भारताचा युवा सलामीवीर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) व ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यांना मागे टाकले.
भारताविरुद्ध केली होती शानदार कामगिरी
एजाज पटेल प्रथमच भारत दौऱ्यावर आला होता. न्यूझीलंड संघाने कानपूर व मुंबई येथे दोन कसोटी भारतीय संघाविरुद्ध खेळल्या. कानपूर कसोटी अनिर्णित राहिली तर मुंबई कसोटी भारतीय संघाने आपल्या नावे करत मालिका जिंकली. मुंबई कसोटीत एजाजने पहिल्या डावात दहा बळी घेऊन विश्वविक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी अशी कामगिरी केवळ इंग्लंडचे जिम लेकर व भारताच्या अनिल कुंबळे यांनाच करता आली होती. एजाजने या सामन्यात दोन्ही डावात मिळून १४ बळी मिळवलेले. पहिल्या सामन्यात ही तो तीन बळी घेण्यात यशस्वी ठरला होता.
मयंक व स्टार्कला सोडले मागे
एजाजसोबत या पुरस्कारासाठी भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना नामांकन मिळाले होते. मयंकने मुंबई कसोटीत शतक साजरे केले होते. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरीअन येथील पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. दुसरीकडे, मिचेल स्टार्कने ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात आठ बळी मिळविण्यात यशस्वी ठरलेला.
अशी आहे एजाजची कारकीर्द
एजाज पटेलने आतापर्यंत ११ कसोटी सामने खेळले असून ४३ बळी घेतले आहेत. २०१८ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. भारताविरुद्ध एका डावात १० बळी घेतल्यानंतर एजाज पटेलला न्यूझीलंडच्या पुढील कसोटी मालिकेतील संघात स्थान मिळू शकले नाही. न्यूझीलंड संघ सध्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मात्र, न्यूझीलंडमध्ये खेळपट्ट्या फिरकीला मदत करत नसल्याने एजाजची संघात निवड झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-