भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (3 सप्टेंबर) अजय रात्रा यांची भारताच्या पुरुष संघाच्या निवड समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ते सलील अंकोला यांची जागा घेतील. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासह रात्रा भारतीय संघाची निवड करतील.
माजी यष्टिरक्षक फलंदाज रात्राची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या 18 सामन्यांमध्ये संपली. 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केल्यानंतर त्यांनी 6 कसोटी आणि 12 वनडे सामने खेळले आणि अनुक्रमे 163 आणि 90 धावा केल्या. मात्र, रात्रा यांना देशांतर्गत क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्यांनी हरियाणासाठी 99 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4029 धावा केल्या होत्या. तसेच यष्टीमागे 240 हून अधिक फलंदाजांना बाद केले होते.
“भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CEC) अजय रात्रा यांची अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरुष निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये रात्रा सलील अंकोला यांची जागा घेतील,” असे बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रात्रा अनुभवी असून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड प्रभावी आहे. निवडकर्ता म्हणून, जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला ओळखण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रात्रा निवड समितीच्या विद्यमान सदस्यांसोबत जवळून काम करतील.
42 वर्षीय रात्रा यांना आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेदरम्यान ते भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. आगरकर यांची गेल्या वर्षी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम विभागातील दोन निवडक होते. अंकोला आधीच समितीचा भाग होते. रात्रा गुरुवारपासून पदभार स्वीकारणार आहेत. भारताला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारताच्या निवड समितीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर रात्रा म्हणाले, “हा एक मोठा सन्मान आणि आव्हान आहे. मी भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्यासाठी उत्सुक आहे,” असे त्यांनी पीटीआयला सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती