भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची लढत झाली. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय संघाने ३७२ धावांनी मोठा विजय नोंदवला. असे असले तरी, न्यूझीलंड संघातील फिरकीपटू एजाज पटेल हे नाव चांगलेच चर्चेत आहे. पहिल्या डावात १० गडी बाद करून इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२५ धावांचा डोंगर उभारला होता, तर एजाज पटेलने भारतीय संघातील सर्व १० फलंदाजांना तंबूत पाठवत इतिहास रचला होता. असा कारनामा करणारा तो केवळ तिसराच गोलंदाज ठरला. तसेच परदेशात जाऊन अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरी नंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तसेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये एजाज पटेल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसून येत आहे. त्यावेळी त्याचे कुटुंबीय स्टँड्स बसून त्याचा उत्साह वाढवताना दिसून येत आहेत. एजाज पटेल देखील त्यांच्याशी संवाद साधताना दिसून येत आहे.
एजाज पटेलच्या बोलण्यावरून असे वाटत आहे की, तो कोणाला तरी शोधतोय. अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, एजाज पटेल भारतीय वंशाचा खेळाडू आहे. मुंबईच्या जोगेश्वरी भागात त्याचे नातेवाईक राहतात. तसेच त्याला हिंदी देखील बोलता येते.
Ajaz Patel's family is here at the Wankhede 😁🔥#INDvsNZ #Cricket pic.twitter.com/nwo5MlOw2s
— Sameer Allana (@HitmanCricket) December 5, 2021
भारतासोबत आहे खास नाते
एजाज पटेल न्युझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करत असला, तरी देखील तो मुळचा भारतीय आहे. त्याचा जन्म २१ ऑक्टोबर १९८८ रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबईत झाला होता. एजाज पटेल ८ वर्षांचा असताना तो आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडला स्थायिक झाला होता. कुटुंबातील सदस्य न्यूझीलंडमध्ये असल्यामुळे त्याचे शिक्षण देखील न्यूझीलंडमध्ये झाले. तिथेच त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अगरवालच्या फलंदाजीतून घेतला धडा’, न्यूझीलंडच्या अर्धशतकवीराचा खुलासा
‘विराटसने’चा वानखेडेवर पराक्रम! न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान
मायभूमीवर २०१३ पासून टीम इंडिया अजेय! ‘या’ संघांना भारतभूमीत पाजले पराभवाचे पाणी